मनसेचा मोठा डाव, नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या रणरागिणीला वांद्रे पूर्वमधून रिंगणात उतरवलं
तृप्ती सावंत यांनी 2015 सालच्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर नारायण राणेंचा पराभव केला होता
मुंबई : मुंबई भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा आणि माजी आमदार तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांचा मनसेत (MNS) प्रवेश केला आहे. मनसेत प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून मनसेकडून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वांद्रे पूर्वमध्ये आता झिशान सिद्धीकी, वरुण सरदेसाई आणि तृप्ती सावंत अशी तिरंगी लढत रंगणार आहे.
वांद्रे पूर्व विधानसभेत उबाठा गटाचे वरून सरदेसाई, NCP चे झिशान सिद्दीकी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविरुद्ध तृप्ती सावंत लढणार आहे. तृप्ती सावंत यांनी 2015 सालच्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर नारायण राणेंचा पराभव केला होता. आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांना शिवसेनेनं तिकीट दिलं होतं. त्यावेळी राणे काँग्रेसच्या तिकीटावर लढले होते. मग 2019 साली तृप्ती सावंतांचं तिकीट कापून शिवसेनेनं ते विश्वनाथ महाडेश्वरांना दिलं होतं. त्यावेळी सावंतांनी बंडखोरी केली.
तृप्ती सावंत यांनी मनसेत जाण्याचा निर्णय का घेतला?
त्यामुळं शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन होऊन काँग्रेसचे झिशान सिद्दिकी निवडून आले होते. मधल्या काळात तृप्ती सावंत भाजपत आणि आता झिशान अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले. पर्यायानं दोघंही महायुतीत असल्यावे तृप्ती सावंत यांनी मनसेत जाण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
झिशान सिद्दिकी यांच्या अडचणीत वाढ होणार
मुंबईतील वांद्रे पूर्वच्या जागेवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे असून याठिकाणी झिशान सिद्दीकी आमदार आहेत. झिशान सिद्दिकींनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर ठाकरेंकडून वरुण सरदेसाई आहे. मात्र, आता या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर हे आज या मतदार संघातून अपक्ष उमेदवारी भरणार आहेत. त्यामुळे आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचे झिशान सिद्दिकी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : झिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्वमध्ये 'भाईजान'चा पाठिंबा, ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंचं टेन्शन वाढलं?