(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाटणच्या जागेवर ठाकरेंकडून उमेदवार जाहीर, सत्यजितसिंह पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज कधी भरणार ते सांगून टाकलं, म्हणाले..
Patan Assembly Election : सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात शिवेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हर्षद कदम यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
सातारा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी 65 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. पाटण विधानसभा मतदारसंघात सत्यजितसिंह पाटणकर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. आज सत्यजितसिंह पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष आणि चिन्ह कोणतेही असो सत्यजितसिंह पाटणकर उमेदवार हवेती अशी भूमिका घेतली आहे. पाटणकर यांनी देखील सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळं आगामी येत्या काही दिवसांमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील.
चिन्ह कोणतंही असो सत्यजितसिंह पाटणकर उमेदवार हवेत
पाटण विधानसभा मतदार संघातील उमेदवार बदलण्याची महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे. चिन्ह कोणतेही असो सत्यजित पाटणकर उमेदवार हवेत अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. पाटणकर यांच्या समर्थनासाठी कराड- पाटण रस्त्यावर कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातील पाटणकर समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत सत्यजितसिंह पाटणकर यांना उमेदवारी मागितली आहे. तसेच चिन्ह कोणतेही असो मात्र उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर अशी भूमिका कार्यकर्ते मांडत आहेत. महायुतीतून शिवसेनेने मंत्री शंभूराज देसाई यांना उमेदवारी जाहीर केली असून महाविकास आघाडीतील तिढा वाढताना दिसत आहे.
महाविकास आघाडी तिढा कसा सोडवणार? चार शक्यता कोणत्या?
शिवसेनेनं हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. हर्षद कदम यांची उमेदवारी कायम राहू शकते. कदम यांची उमेदवारी कायम राहिल्यास सत्यजितसिंह पाटणकर अपक्ष लढू शकतात. तिसरी शक्यता पाटणची जागा ठाकरेंनी पवारांना सोडल्यास तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर सत्यजितसिंह पाटणकर लढतील. चौथी शक्यता, सत्यजितसिंह पाटणकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास मशाल चिन्हावर ते लढू शकतात, या शक्यतेमध्ये हर्षद कदम यांना उमेदवारी मागं घ्यावी लागू शकते.
दरम्यान, येत्या पाच दिवसात पाटण विधानसभा मतदारसंघाचा तिढा महाविकास आघाडी कसा सोडवणार हे पाहायला मिळेल.
इतर बातम्या :
Maharashtra Vidhan Sabha Election: चांद्यापासून ते बांद्यापर्यंत आज कोणी कोणी अर्ज केले?