सिंधुदुर्ग : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या लढती आता अंतिम होत आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच मुख्य सामना होत असून आता या दोन्ही युती व आघाडींकडून उमेदवारांच्या याद्यांना अंतिम स्वरुप देण्यात येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून शिवसेना शिंदे गटाकडूनही 22 उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात येत आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये कणकवली मतदारसंघातून विद्यमान आमदार नितेश राणेंना उमेदवारी दिली आहे. तर, निलेश राणेंनी (Nilesh Rane) काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला असून तेही विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. तत्पूर्वी नितेश राणेंविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने संदेश पारकर या डॅशिंग नेत्याला मैदानात उतरवलं आहे. नितेश राणे येथील कणकवली-देवगड मतदारसंघातून दोनवेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे, यंदा ते हॅटट्रीक साधण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांच्या अडचणी वाढताना दिसून येते. कारण, नितेश राणेंविरुद्ध एका मुस्लीम (Muslim) नेत्यानेही शड्डू ठोकला आहे. राणेंनी मुस्लीम समजाबाबत केलेल्या वक्तव्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे उमेदवार नवाज खाणी यांनी म्हटलंय.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाली सुरू असून बंडखोरी रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेते कामाला लागले आहेत. मात्र, याचदरम्यान, मुस्लिम समाजावर टीका करणे आमदार नितेश राणेना भोवणार आहे. कारण, मागील अनेक निवडणुकांमध्ये सहकार्य करणाऱ्या मुस्लिम समाजाच्यावतीने अपक्ष उमेदवार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवण्यात येणार आहे. मुस्लिम समाजाचे नेते नावाज खाणी यांनी नितेश राणे यांच्या विरोधात दंड थोपटले असून नितेश राणेंना समाजाची ताकद दाखवणार असल्याचं खाणी यांनी म्हटलं आहे. तसेच, एमआयएम पक्षाबाबत माझी बोलणी सुरू असून मला पाठिंबा मिळेल, असा विश्वास आहे. मी माझ्या धर्मातील वरिष्ठांना, समाजातील महत्त्वाच्या पदाधिकारी व व्यक्तींना विचारुनच मी हा निर्णय घेतलेला आहे, असेही खाणी यांनी म्हटले. त्यामुळे, खाणी यांनी नितेश राणेंविरुद्ध रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे.
सर्वधर्म समभावाचा संदेश घेऊन लढणार
नितेश राणे दोन गटांमध्ये वाद करण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्या जिल्ह्यात तसं चालत नाही, यापूर्वीही तसं नव्हतं. त्यामुळे, सर्वधर्म समभाव हा संदेश घेऊन मी नितेश राणेंविरुद्ध निवडणूक लढवणार आहे. मुस्लीम समाजाने राणेंना यापूर्वी भरभरुन दिलंय. मात्र, आता राणेंविरुद्ध मी मैदानात उतरणार आहे, मी माझी भूमिका जाहीर केल्यापासून माझ्यावर दबाव येत आहे, मला धमकीचे फोन येत आहेत, पण आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार, असे नावाज खाणी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
हेही वाचा
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग