मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात काल राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं.  तिसऱ्या टप्प्यात राज्यात सरासरी 61. 83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात 1 कोटी 59 लाख 45 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महत्त्वाची बाब म्हणजे हातकणंगलेत सर्वाधिक 70.81 टक्के मतदान झालं, तर पुणेकर मतदारांनी मात्र निराशा केली, पुण्यात केवळ 47.97 टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील 14 जागांसाठी 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदारांपैकी आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार 61.83 टक्के म्हणजेच जवळपास 1 कोटी 59 लाख 45  हजार 795 मतदारांनी मतदान केले

काल, 23 एप्रिल रोजी राज्यात तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान झालं.



मतदारसंघ - टक्केवारी

कोल्हापूर - 69.51 टक्के


हातकणंगले - 70.81 टक्के

सांगली - 64.45 टक्के  

जालना - 64.57  टक्के


अहमदनगर - 63.93 टक्के

माढा - 63.58 टक्के


रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 61.91 टक्के

औरंगाबाद - 61.87 टक्के

बारामती - 60  टक्के   

रायगड - 61.94 टक्के     

जळगाव -  56.10 टक्के


रावेर -  61.37 टक्के   

सातारा - 60.01  टक्के

पुणे - 47.97 टक्के

सरासरी - 61.83  टक्के

राज्यभरात सध्या तापमान चांगलंच वाढत आहे. उन्हात फिरताना अंगाची लाही लाही होत असल्यामुळे अनेक जण घरी बसणं पसंत करतात. मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपला हक्क बजावणं अपेक्षित होतं. परंतु  तापमानाचा पारा वाढल्यानंतर राज्यभरात मतदानाची टक्केवारी घसरल्याचं चित्र पाहायला मिळालं.

या टप्प्यात उदयन राजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, विनायक राऊत, सुनिल तटकरे, रावसाहेब दानवे, सुप्रिया सुळे, गिरीश बापट, चंद्रकांत खैरे यांसारख्या दिग्गजांचं भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद झाली आहेत. निवडणुकांच्या तोंडावर सतत चर्चेत राहिलेल्या माढा, अहमदनगर, जालना, सातारा, जळगाव या जागांचा समावेश या टप्प्यात होता.

ऐनवेळी अपेक्षित उमेदवारांचं कापलेलं तिकीट, दुसऱ्या पक्षातील 'आयारामां'ना दिलेली उमेदवारी, त्यावरुन झालेले रुसवे-फुगवे यामुळे यापैकी बहुतांश मतदारसंघ चर्चेत राहिले होते. सगळ्याच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे प्रचारही जोरदार झाला. आता मतदारराजाने ईव्हीएमचं बटण दाबून कुणाला कौल दिला, हे बरोबर एका महिन्याने म्हणजे 23 मे 2019 रोजी समजेल.

तिसऱ्या टप्प्यातील रंगतदार लढती

पुणे : गिरीश बापट (भाजप) vs मोहन जोशी (काँग्रेस)
बारामती : कांचन कुल (भाजप) vs सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) 
माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर  (भाजप) vs संजय शिंदे (राष्ट्रवादी)
सांगली : संजय पाटील  (भाजप) vs विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी)
सातारा :  नरेंद्र पाटील (शिवसेना) vs उदयनराजे भोसले  (राष्ट्रवादी)
कोल्हापूर :  संजय मंडलिक (शिवसेना) vs धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
हातकणंगले : धैर्यशील माने (शिवसेना) vs राजू शेट्टी  (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी)
जळगाव :  उन्मेष पाटील (भाजप) vs गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
रावेर :  रक्षा खडसे (भाजप) vs उल्हास पाटील (काँग्रेस)
अहमदनगर :  सुजय विखे (भाजप) vs संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
जालना :  रावसाहेब दानवे (भाजप) vs विलास औताडे (काँग्रेस)
औरंगाबाद :  चंद्रकांत खैरे  (शिवसेना) vs सुभाष झांबड (काँग्रेस)
रायगड :  अनंत गीते  (शिवसेना) vs सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग :  विनायक राऊत  (शिवसेना) vs नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) vs निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)