कल्याण : देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरु आहेत. आपल्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेत कुणाला पाठवायचं, यावरुन नाक्यावर, चहाच्या टपरीवर सगळीकडे चर्चा सुरु आहे. यात मांडल्या जाणाऱ्या निकषात उमेदवारांचं शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र यातल्या चार प्रमुख उमेदवारांचं शिक्षण पाहिलं, तर तिघांचं शिक्षण हे जेमतेम दहावी, बारावी आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेत यंदा एज्युकेशन फॅक्टर महत्त्वाचा ठरण्याची चिन्हं आहेत.
- कल्याण लोकसभेत महायुती, महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि सपा-बसपा युती असे चार प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
- यापैकी विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे हाडांचे डॉक्टर आहेत. त्यांनी एमबीबीएस आणि एमएस पर्यंत शिक्षण घेतलं आहे.
- महाआघाडीचे उमेदवार आणि ठाणे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक बाबाजी पाटील यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
- वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडाव यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
- तर सपा-बसपा आघाडीचे उमेदवार रवींद्र केणे यांनीही दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.
- रिंगणात असलेल्या एकूण 28 उमेदवारांपैकी अवघे 9 उमेदवार हे पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत. उर्वरित उमेदवारांमध्ये दहावी नापास, नववी, आठवी, पाचवी शिकलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे.
कल्याण लोकसभेत सुशिक्षित मतदारांची संख्या मोठी आहे. त्यातही तरुण मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आपण जो खासदार निवडून देतो, तो चांगला शिकलेला असावा, असं तरुणांचं मत आहे.
उमेदवारांच्या शिक्षणाबाबत तरुणांची मतं ऐकल्यानंतर उमेदवार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना विचारलं. महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना त्यांच्या शिक्षणाबाबत विचारलं असता, आपल्याला गरिबीमुळे दहावीच्या पुढे शिकता न आल्याचं ते म्हणाले. पण सोबतच लोकसभेत, विधानसभेत अनेक अल्पशिक्षित आमदार, खासदार असल्याचं सांगत त्यांनी अल्पशिक्षणाचं समर्थनही केलं.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र उमेदवार कुणीही असला, तरी शिक्षण महत्त्वाचंच असल्याचं सांगितलं. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर, तर त्यांच्यापूर्वी कल्याणचे खासदार असलेले आनंद परांजपे हेदेखील इंजिनिअर होते. संसदेत मांडण्यात येणारी विधेयकं, विविध चर्चा या कळण्यापुरतं तरी शिक्षण असावं, असं म्हणत शिवसेनेचे कल्याण लोकसभेतील नेते राजेंद्र देवळेकर यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.
शिकेल तोच टिकेल, अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. पण राजकारणात मात्र अजूनही सुशिक्षित वर्ग यायला तयार नसल्याने कल्याणसारख्या परिसरात अजूनही तब्बल 19 अल्पशिक्षित उमेदवार निवडणूक लढतायत. त्यामुळं डर्टी गेम म्हटल्या जाणाऱ्या पॉलिटिक्सला क्लीन करण्यासाठी उच्चशिक्षितांनी राजकारणात येण्याची गरज आहे.
कल्याण लोकसभेत उमेदवारांच्या शिक्षणाची चर्चा; चारपैकी तीन प्रमुख उमेदवार दहावी, बारावी शिकलेले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Apr 2019 09:31 PM (IST)
कल्याण लोकसभेत सध्या उमेदवारांच्या शिक्षणाची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण रिंगणात असलेले बहुतांशी उमेदवार हे जेमतेम दहावी शिकलेले आहेत. त्यामुळे सुशिक्षित मतदार यावेळी पक्ष, उमेदवार बघणार? की शिक्षण बघणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -