नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारींचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. परंतु हृदयाची क्रिया बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं कळतं. आज (16 एप्रिल) संध्याकाळी त्याला दिल्लीच्या साकेत मॅक्स रुग्णालयात मृतावस्थेत आणलं केलं. डॉक्टरांनी 5.50 वाजता त्याला मृत घोषित केलं.


रोहित शेखर दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये राहत होता. आई आणि पत्नीने त्याला साकेत रुग्णालयात घेऊन आले होते. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दिल्ली दक्षिणचे पोलिस उपायुक्त विजय कुमार यांनी ही माहिती दिली.


कोर्टात खटला, 6 वर्षांनी अधिकार मिळाला

मागील वर्षी 18 ऑक्टोबर 2018 रोजी एनडी तिवारी यांचं निधन झालं होतं. 2008 मध्ये रोहित शेखरने कोर्टात खटला दाखल करुन एनडी तिवारीच आपले बायोलॉजिकल वडील असल्याचा दावा केला होता. यानंतर 2011 मध्ये तिवारी यांना डीएनए तपासणीसाठी रक्त द्यावं लागलं होतं. रक्त तपासणीचा अहवाल सार्वजनिक न करण्याची विनंती एनडी तिवारींनी कोर्टात केली होती. परंतु कोर्टाने ही विनंती फेटाळली.

अखेर डीएनए रिपोर्टमध्ये एनडी तिवारीच रोहित शेखरचे बायोलॉजिकल वडील असल्याचं समोर आलं. मोठ्या कायदेशीर लढाईनंतर एनडी तिवारींनी राहुल शेअर आपला मुलगा असल्याचं मान्य केलं होतं. यानंतर तिवारी यांनी 2014 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी लग्न केलं. कोर्टातील वाद संपल्यानंतर रोहित वडिलांसोबतच राहत होता.

रोहित शेखर 2017 मध्ये भाजपमध्ये सामील झाला होता. एक वर्षापूर्वी त्याने अपूर्वा शुक्लासोबत लग्न केलं होतं. मूळची इंदूरची असलेली अपूर्वा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करते. रोहितच्या साखरपुड्याच्या वेळी एनडी तिवारी यांच्यावर मॅक्स रुग्णालयातच उपचार सुरु होते.