नवी दिल्ली : निवडणुकीची रणधुमाळी ऐन भरात असतानाच आज काँग्रेसनं थेट पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातमधल्या संपत्तीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गांधीनगरमध्ये मोदींच्या नावावर असलेल्या एका प्लॉटची मालकी, त्याचा नंबर याबाबतची खोटी माहिती दिल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेच्या आधारे काँग्रेसनं हा आरोप केला आहे.


पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधल्या प्राँपर्टीचं रहस्य काय? मोदींच्या शपथपत्रात त्याबदद्ल उलटसुलट माहिती का सांगितली जाते? हे प्रश्न आज काँग्रेसनं उपस्थित केले. सुप्रीम कोर्टात मोदींनी त्यांच्या शपथपत्रात संपत्तीची माहिती दडवल्याबाबत याचिका दाखल झाली आहे. त्यावरुन काँग्रेसनं मोदींवर हे थेट आरोप केले आहेत.


गांधीनगरमधील प्राईम लोकेशनचा 411 हा प्लॉट आपल्या नावावर असल्याचं मोदींनी 2007 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शपथपत्रात म्हटलं होतं. 326 चौरस मीटरचा हा प्लॉट ज्याची खरेदी किंमत तेव्हा 1. कोटी 30 लाख सांगितली होती. आज बाजारभावानं त्याची किंमत 1 कोटी 18 लाख आहे.


पण 2012, 2014 नंतरच्या निवडणुकांमध्ये मात्र या प्लॉटबद्दलची माहिती शपथपत्रात देताना अनेक बदल करण्यात आले आहेत. एक तर या प्लॉटचा नंबर 411 ऐवजी 401 ए करण्यात आला, मोदी त्याचे पूर्ण मालक नव्हेत तर एक चतुर्थांशच मालक असल्याचं सांगितलं गेलं.


महत्त्वाची बाब म्हणजे 401 नावाचा हा प्लॉट अरुण जेटलींनीही त्यांच्या नावावर असल्याचं शपथपत्रात सांगितलं आहे. गुजरातमधील लँड रेकॉर्डनुसार 401 अ असा कुठला प्लॉट नोंद नसल्याचंही काँग्रेसचं म्हणणं आहे. तसेच शपथपत्रात अशी संपत्तीची माहिती मोदी का दडवत आहेत, असा काँग्रेसचा सवाल आहे.


माजी पत्रकार साकेत गोखले यांनी सुप्रीम कोर्टात मोदींच्या संपत्तीबाबत ही याचिका दाखल केली. काही पत्रकार या संपत्तीची माहिती काढायला गेले असता, त्यांना हटकण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळेच इतकी गुप्तता का पाळली जातेय असा सवाल काँग्रेस उपस्थित केला आहे.


लोससभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातील मतदान ऐन तोंडावर असताना काँग्रेसच्या या आरोपानंतर चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा कुठल्या वळणावर जाणार आणि यावेळी वाराणसीमधून लढताना मोदी शपथपत्रात या संपत्तीबाबत नेमकी काय माहिती देणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.