लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप हायकमांडपर्यंत कसा पोहोचणार 543 जागांचा ग्राउंड रिपोर्ट? पक्षाचा मास्टरप्लान
Lok Sabha Elections: आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेत भाजपनं देशभराती मतदारसंघांचा ग्राउंड रिपोर्ट मिळवण्यासाठी एक रणनिती आखली आहे.
Lok Sabha Elections 2024: देशातील सर्व 543 लोकसभेच्या जागांवर विस्तारकांची नियुक्ती करण्याचा निर्णय भाजपनं (BJP) घेतला आहे. यासाठी पक्ष हाय कमांडनं राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल (Sunil Bansal) यांच्या नेतृत्वात 10 नेत्यांची समिती देखील तयार केली आहे. पक्षाचे हे 10 नेते वेगवेगळ्या राज्यांमधील विस्तारकांची निवड करतील आणि त्यांच्या प्रशिक्षणाचीही व्यवस्था करतील. यानंतर, निवडण्यात आलेल्या विस्तारकांना वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये पार्टी उमेदवार जिंकण्यासाठी नियुक्ती केली जाईल.
आयएएनएस (IANS) या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, 10 नेत्यांच्या या समितीवर देशभरात पक्षाचा विस्तार करण्याची योजना आखण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असेल, तसेच, मध्यवर्ती स्तरावर निवडण्यात आलेले सर्व समितीचे सदस्य पक्षाचे सरचिटणीस सुनील बन्सल यांना अहवाल देतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना विस्तारक योजनेचं संयोजक बनवण्यात आलं आहे, तर सह-संयोजकाची जबाबदारी बिहार भाजपच्या संघटनेचे सरचिटणीस भीखू भाई दालसानिया आणि राजकुमार शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
लोकसभा मतदारसंघांचा अहवाल देईल
या व्यतिरिक्त, वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वात राज्य स्तरावर एक संघ तयार केला जाईल. हे विस्तारक त्यांच्या लोकसभेच्या मतदारसंघांच्या अहवालांची माहिती राज्याच्या संयोजकांना देतील, जे ते राष्ट्रीय संघाकडे नेण्यासाठी काम करतील. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यांमधील सर्व विस्तारकांची निवड, प्रशिक्षण आणि त्यांची त्या-त्या भागात नियुक्ती करणं हे भाजपानं नियोजित केलं आहे.
पहिल्या 160 जागांवर विस्तारकांची नियुक्ती केली जाईल
महत्त्वाचं म्हणजे, भाजपनं यापूर्वी निर्णय घेतला होता की, देशातील 160 लोकसभेच्या जागांवर निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ते विस्तारक तैनात करतील. अशाच मतदारसंघांमध्ये विस्तारक नियुक्त केले जातील, ज्या मतदारसंघांमध्ये भाजपचं पारडं फारसं जड नसेल. नंतर, परिस्थितीनुसार आणि आवश्यकतेनुसार विस्तारकांची संख्या वाढवली जाईल. दरम्यान, आता भाजपनं देशातील सर्व 543 लोकसभा जागांवर विस्तारक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
विस्तारक समितीमध्ये कोण असेल?
भाजपचे विस्तारक पक्षाचे असे कामगार असतील, ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्यांच्याशी निगडीत कोणत्याही संस्थेसह स्वयंसेवक आणि पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केलं आहे. असं म्हटलं जातं की, युनियनच्या पार्श्वभूमी आणि पूर्ण काळ पक्षासाठी कार्यकर्ता म्हणून काम केल्यामुळे हे लोकं विस्तारक म्हणून अगदी तळागाळापर्यंत पोहोचू शकतील, त्यामुळे पक्षाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :