(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत भाषण संपवून बसले आणि काही वेळात स्टेजवरच निधन
Latur Gram Panchayat Election : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असतानच लातूर जिल्ह्यातून धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. प्रचारसभेतील भाषण केलं आणि काही वेळात व्यासपीठावरच वक्त्याचं निधन झाल्याची घटना मुरुड या गावात घडली आहे.
Latur Gram Panchayat Election : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat Election) रणसंग्राम सुरु असतानच लातूर (Latur) जिल्ह्यातून धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये प्रचाराचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेतील भाषण केलं आणि काही वेळातच व्यासपीठावरच (Stage) वक्त्याचं निधन झाल्याची घटना मुरुड (Murud) या गावात घडली आहे. अमर पुंडलिक नाडे असं मृत वक्त्याचं नाव आहे.
लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. मुरुडची सरपंचपदाची (Sarpanch) निवडणूक लढवत असलेल्या अमृता अमर नाडे यांचे पती अमर पुंडलिक नाडे यांनी काल (14 डिसेंबर) जाहीर सभेत भाषण केलं. त्यानंतर थोड्या वेळात व्यासपीठावरच हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने त्यांचं निधन झाले. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
भाषण संपवून खाली बसले आणि हार्ट अटॅकने निधन झालं
मुरुड येथील तरुण व्यावसायिक, ग्रामपंचायत सदस्य तसेच अष्टविनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरबापू नाडे (वय 43 वर्षे) यांचे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निधन झालं. मुरुड ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. यानिमित्त बुधवारी प्रचारसभा सुरु होती. सभेत भाषण संपवून अमर नाडे हे खाली आपल्या खुर्चीवर बसले. त्यावेळी शेवटच्या वक्त्याचे भाषण सुरु असताना नाडे यांना अस्वस्थ वाटू लागलं. याची माहिती त्यांनी शेजारी बसलेल्या आपल्या पत्नीलाही दिली. पण काही हालचाल करणार त्या आधीच ते खुर्चीवरुन कोसळले. अमर नाडे यांच्या मदतीसाठी अनेक जण सरसावले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांनी त्यांना मृत घोषित केलं.
राज्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत
लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मुरुड ग्रामपंचायतीकडे पाहिलं जातं. इथला गुराचा बाजार राज्यात नावाजलेला आहे. अतिशय सशक्त आणि आर्थिकरित्या मजबूत असलेली ही ग्रामपंचायत आहे. सतरा सदस्यांच्या या ग्रामपंचायतीची निवडणूक कायमच चर्चेत असते. नाडे परिवाराचे कायम इथल्या राजकारणावर पकड राहिली आहे. मृत अमर नाडे यांचे पॅनल हे भाजपा प्रणित होते. त्याच्यासमोर दिलीप दादा नाडे यांचे तसंच काँग्रेस प्रणित पॅनलचे आव्हान होते. गावात तिरंगी लढत होती. कालच्या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. आज अकराच्या आसपास मुरुड इथेच अमर नाडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नाडे परिवार मागील अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय असल्याने या परिवाराचा दांडगा जनसंपर्क होता.