वारसदार म्हणून आनंद दिघेंना मीच अग्नी दिला, एकनाथ शिंदेंच्या टीकेवर केदार दिघेंचं सडेतोड उत्तर; म्हणाले, ते वय काय...
कोरपी पाचपाखाडी या मतदारसंघाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या मतदाससंघात केदार दिघे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आहेत. येथे कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ठाणे : विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) कोपरी पाचपाखाडी (Kopri Pachpakhadi) हा मतदारसंघ राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण या जागेवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने केदार दिघे (Kedar Dighe) यांना तिकीट दिले आहे. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिंदे यांनी यांनी केदार दिघे यांच्यावर टीका केली होती. मी केदार दिघे यांना आनंद दिघे यांच्यासोबत कधीही पाहिले नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. या टीकेनंतर आता केदार दिघेदेखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी आनंद दिघे यांच्या पार्थिवाला मीच वारसदार म्हणून अग्नी दिला आहे, असं म्हणत त्यांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते?
एकनाथ शिंदे यांना एबीपी माझाच्या मुलाखतीत त्यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाबाबत बोलतं करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या मतदासंघात अद्याप विरोधकांमधील कोणीही मोठ्या नेत्याने सभा घेतलेली नाही. मात्र या मतदारसंघात दिघे हे आडनाव असलेला उमेदवार तुमच्या विरोधात उभा आहे, याबाबत काय वाटतं, असं शिंदे यांना विचारण्यात आलं होतं. यावर बोलताना आनंद दिघे आणि केदार दिघे यांच्यात खूप सारं अंतर आहे. आनंद दिघे हे माझे गुरु आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन मी राजकारणात पुढे चाललो आहे. मला केदार दिघे हे आनंद दिघे यांच्यासोबत कधीही दिसले नाहीत, असा दावा शिंदे यांनी केला होता. तसेच आडनावाने काहीही फरक पडत नाही, असा टोला शिंदे यांनी लगावला होता. त्यावरच आता केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केदार दिघे नेमकं काय म्हणाले?
केदार दिघे यांनी एबीपी माझाच्या वृत्ताचा स्क्रीनशॉट एक्स या समाजमाध्यमावर शेअर केला आहे. तसेच शिंदे यांच्यावर टीका केली आहे. दिघे साहेबांच्या पवित्र पार्थिवाला मी वारसदार म्हणून अग्नी दिला आहे. मी माझ्या लहान वयात दिघे साहेबांसोबत वावरलेलो आहे. ते वय काय राजकारण करण्याचं नव्हतं, इतकं मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला कळू नये, असा बोचरी टीका केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
दिघे साहेबांच्या पवित्र पार्थिवाला मी वारसदार म्हणून अग्नी दिला आहे.मी माझ्या लहान वयात त दिघे साहेबांसोबत वावरलो आहे. ते वय काय राजकारण करण्याचं नव्हतं इतकं मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला कळू नये. pic.twitter.com/tildPn0ShF
— Kedar Dighe (@MiKedarDighe) November 17, 2024
केदार दिघे की एकनाथ शिंदे, कोण जिंकणार?
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना ज्यांना गुरु मानतात त्यांचाच पुतण्या शिंदे यांच्याविरोधात उभा आहे. म्हणूनच कोपरी पाचपाखाडी हा मतदारसंघ सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. या जागेवर विजयी कामगिरी करण्यासाठी केदार दिघे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे शिंदे यांनीदेखी या जागेवरून माझाच विजय होईल, असा विश्वास बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे या जागेवर कोण सरस ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
आनंद दिघे माझे गुरुवर्य, केदार दिघे कधीच..., कोपरी पाचपाखाडी मतदारसंघावर बोलताना एकनाथ शिंदे कडाडले!