Karnataka Elections: कर्नाटक (Karnataka) राज्यातील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसाठी शनिवार (6 मे) हा अत्यंत व्यस्त दिवस असणार आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींसह (PM Modi) भाजपच्या बड्या दिग्गजांचे रोड शो आणि जाहीर सभा होणार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही आज निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत.


सोनिया गांधी (Sonia Gandhi) हुबळी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत. त्याचवेळी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हेही सोनिया गांधींसोबत हुबळीच्या (Hubli) जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधीही आज जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. राहुल गांधींचा 7 मे रोजी बंगळुरूमध्ये (Bengluru) भव्य रोड शो होणार आहे.


सोनिया गांधी पहिल्यांदाच निवडणूक प्रचारात


गेल्या चार वर्षांत सोनिया गांधी (Sonia Gandhi) पहिल्यांदाच प्रचार करणार आहेत. सोनिया गांधी हुबळी-धारवाड सेंट्रलमधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांच्या बाजूने जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये आले आहेत. तर, भाजपकडून हुबळी-धारवाड मतदारसंघातून महेश टेंगीनकाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.






सोनिया गांधींची एकमेव जाहीर सभा


सोनिया गांधी यांची कर्नाटकातील (Karnataka) ही एकमेव जाहीर सभा आहे. संध्याकाळी 6 वाजता हुबळी येथे जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांच्या बाजूने निवडणूक रॅलीला त्या संबोधित करणार आहे आणि त्यानंतर तिथून परततील. सोनिया गांधींच्या जाहीर सभेत मल्लिकार्जुन खर्गेही सहभागी होणार आहेत.






राहुल गांधींच्या एकाच दिवशी तीन जाहीर सभा


कर्नाटकात प्रचारादरम्यान राहुल गांधींचे (Rahul Gandhi) सलग 3 कार्यक्रम होणार आहेत. बेळगावच्या यमकनमर्डी येथे दुपारी 2.50 वाजता राहुल गांधी एका सभेला संबोधित करतील. यानंतर ते बेळगावमधील (Belgaon) चिक्कोडी येथे दुपारी 4.10 वाजता आणि हुबळी येथे 6 वाजता जाहीर सभांना संबोधित करतील. हुबळीच्या जाहीर सभेत सोनिया गांधींसोबत राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत.






काँग्रेसच्या रॅली आणि रोड शो


कर्नाटकातील निवडणूक (Karnataka Election) प्रचारात काँग्रेसने कोणतीही कसर सोडलेली नाही. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. पक्षाच्या या दिग्गजांनी आतापर्यंत 43 रॅली, 13 रोड शो, महिला आणि तरुणांशी 6 संवाद आणि कार्यकर्त्यांसोबत 5 बैठका घेतल्या आहेत. रविवारी (7 मे), राहुल आणि प्रियंका गांधी बंगळुरूच्या शिवाजी नगरमध्ये संयुक्त रॅली काढणार आहेत.


10 मे रोजी कर्नाटकातील 224 सदस्यीय विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत एकूण 5,21,73,579 मतदार मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Karnataka Election Survey: बेरोजगारी, गरीबी, टीपू सुल्तान.... कर्नाटक निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा कोणता? सर्वेक्षणातून खुलासा