Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात खुनाचे सत्र सुरूच असून गुरुवारी रात्री आठ वाजता पुन्हा एकदा किरकोळ वादातून खून झाल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरातील कामटवाडे येथे सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यावर लाकडी दंडुका मारून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


नाशिक शहरात (Nashik City) नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. सर्रास दिवसाढवळ्या, चाकू, कोयत्याने वार केल्याच्या, प्राणघातक हल्ल्याच्या घटना भरवस्तीत घडत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये दशहत पसरली आहे. अशातच सिडको परिसरातील कामटवाडे येथे गुरुवारी रात्री किरकोळ भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खून केला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी (Ambad Police) संशयित आरोपी हरी दामू निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामटवाडा येथे मयत सदाशिव दामू निकम आणि आरोपी त्याचा भाऊ हरी दामू निकम हे शेजारी राहतात. गुरुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास सदाशिव दामू निकम हे घरासमोर रस्त्यावर बोलत होते. यावेळी संशयित त्याचा भाऊ हरी दामू निकम हा सदाशिव जवळ आला आणि मला शिवीगाळ का करतो, यावरून वाद झाल्यानंतर त्याने सदाशिव याच्या डोक्यात लाकडी दांडुका डोक्यात मारला. यात सदाशिव हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शासकीय जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना सदाशिव यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणात बायडी कैलास सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी हरी दामू निकम याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.


नाशिकचा सिडको परिसर हादरला


नाशिकचा सिडको (Cidko) परिसर हा काही दिवसांपासून खुनाच्या घटनांनी हादरत आहे. काही दिवसांपूर्वीच त्रिमूर्ती चौक या ठिकाणी सापडलेला मोबाईल परत देताना झालेल्या किरकोळ वादात एकाने डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने एक जण गंभीर जखमी होऊन मृत पावला होता. त्यानंतर 25 एप्रिल रोजी एका टोळक्याने हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या मित्रांवर हल्ला करून एका तरुणाच्या डोक्यावर फेवर ब्लॉक मारून त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता लहान भावानेच त्याच्या सख्या मोठ्या भावाचा खून केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून मारहाण करणे, खून, प्राणघात हल्ले यासारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. टवाळ खोरांकडून कोयता चाकू या धारदार शस्त्रांचा वापर सर्रासपणे केला जात असल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे.