देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, अमित शाह यांचे संकेत, जयंत पाटील म्हणाले एकनाथ शिंदे आणि अजितदादा विचार करतील
विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होतील असे संकेत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) वारंवार देत आहेत. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jayant Patil : विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होतील असे संकेत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) वारंवार देत आहेत. याचा आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे विचार करतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले. या विधानसभेनंतर त्यांना कोणतीही संधी असणार नाही हेच अमित शाह सातत्याने सांगत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. माढा येथील सभेनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
आम्ही लढाऊ माणसे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सर्वांच्या मागे लागलेला ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमेरा बंद झाला असे वक्तव्य भुजबळ यांनी केले होते. यावर बोलताना हा त्रास त्यांचा कमी झाला म्हणून ते सत्तेत गेले असे सांगितले. मात्र हा फायदा सर्व एकत्रित राष्ट्रवादीला झाल्याचा दावा भुजबळ यांनी केल्याचे निदर्शनास आणताच , आम्ही लढाऊ माणसे असून आम्हाला याचा कोणताही फायदा झाला नाही असा खुलासा जयंत पाटील यांनी केला. आम्हाला जो ईडीचा त्रास होता तो सुरूच राहिला त्यामुळे भुजबळ यांच्या दाव्यात अर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले. 70000 कोटीच्या घोटाळ्यात आर आर पाटलांचे नावावरून वादळ सुरू झालेले असताना जयंत पाटील यांनी आर आर पाटलांनी सही केली. मात्र, मुख्य सही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचे सांगत याबाबत फडणवीस आणि खुलासा करावा असे वक्तव्य केले. या फ्लो चार्ट वर शेवटची सही मुख्यमंत्र्यांची म्हणजे फडणवीस यांची होती असे त्यांनी सांगितले.
भाजपचे 50 ते 60 देखील निवडून येणार नाहीत
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील महाविकास आघाडीचे दोन उमेदवार तिथे असले तरी ही मैत्रीपूर्ण लढत होईल असे सांगत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळेला महाविकास आघाडीचे 170 ते 180 जागा निवडून येतील आणि भाजपचे 50 ते 60 देखील निवडून येणार नसल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे अमित शाह म्हणाले.