जालन्याच्या राजकीय आखाड्यात उडणार प्रतिष्ठेचा धुरळा; 65 जागांसाठी अस्तित्वाची लढत; पहिल्या महापालिका निवडणुकीआधी जिल्ह्याचे राजकीय चित्र कसे?
Jalna Mahapalika 2026: नव्याने अस्तित्वात आलेल्या जालना महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Jalna Muncipal corporation Election 2026: 2016 नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे राज्यभरात सध्या निवडणुकांचंच वारं वाहतंय. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन दोन वर्षे लोटल्यानंतर जालन्यातील ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे. जालना महापालिका निवडणुकीत भाजप नेते रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2023 मध्ये जालना नगरपालिकेचे रूपांतर जालना महानगरपालिकेत करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच जालन्यात महापालिका निवडणूक होत आहे. त्यामुळे पहिल्याच महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष जोर लावतायत. महापालिकेच्या एकूण 65 जागांसाठी ही अस्तित्वाची लढत ठरणार आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या जालना महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Jalna Mahapalika 2026)
जालना महापालिकेचा इतिहास
जालना नगरपालिकेचं (Jalna) 7 ऑगस्ट 2023 महानगरपालिकेत (Municipal Corporation) रूपांतर झालं. जालना महापालिका ही मराठवाड्यातील (Marathwada) पाचवी महापालिका आहे. जालना नगरपालिकेच्या हद्दीतील संपूर्ण क्षेत्र महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आले. जालना जिल्ह्यात आता 1 महानगरपालिका, 3 नगरपालिका आणि 4 नगरपंचायत यांचा समावेश आहे. भोकरदन, परतुर, अंबड या 3 नगरपालिका असून घनसावंगी, जाफराबाद, मंठा आणि बदनापूर या 4 नगरपंचायती आहेत. जालना नगरपालिकेत 61 नगरसेवक आणि जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा अशा 62 सदस्यांची नियुक्ती झाली होती. जालना शहरात 16 प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे .
1933 मध्ये जालना नगरपरिषद अस्तित्वात आली. 7 ऑगस्ट 2023 रोजी नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झालं. जालन्याची लोकसंख्या सध्या साधारण 3.75 लाख आहे. नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता असून विरोधी पक्ष भाजप होता. जालना नगर परिषदेची शेवटची निवडणूक 27 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती. या निवडणुकीचा निकाल 28 नोव्हेंबर 2016 रोजी घोषित करण्यात आला होता. नगरपरिषदेचा कार्यकाळ 25 डिसेंबर 2021 रोजी संपला आहे.
जालना नगरपालिकेत काय होती स्थिती?
नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या जालना नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगराध्यक्षा विजय झाल्या होत्या. 61 पैकी 29 काँग्रेसचे सदस्य विजयी झाले होते. राष्ट्रवादीच्या 9 नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेसने सत्ता मिळवली होती. तर शिवसेना भाजपला प्रत्येकी 11 जागा मिळाल्या होत्या. नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कालावधी 2021 मध्ये संपला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी लांबणीवर पडल्या. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा मोठा वाटा होता. मात्र, आता गोरंट्याल भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.
नगरपरिषदेचे पक्षीय बलाबल काय होतं?
भाजप: 11
शिवसेना: 12
काँग्रेस: 28
एमआयएम: 0
बसपा: 0
राष्ट्रवादी: 7
माकप: 0
अपक्ष: 3
युतीचे प्रस्ताव, बैठकांचा सिलसिला
सध्याच्या राजकारणामध्ये महानगरपालिकेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठका आणि चर्चांचा सिलसिला सुरू आहे, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक असून नुकताच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे त्यामुळे जालना महानगरपालिकेचा रणसंग्राम यावेळेस अधिक रंजक होणार आहे.
दरम्यान, पारंपरिक मतदारांमध्ये फूट पडू नये यासाठी भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, यामध्ये वर्चस्वाच्या लढाईमध्ये आणि सीमित नगरसेवकांच्या जागामुळे स्वतंत्र निवडणूक लढवण्याची इच्छादेखील महायुतीतील अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक व्यक्त करत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या वरिष्ठांसमोर महायुतीबाबत प्रश्न कायम आहे.
दुसरीकडे,महाविकास आघाडीबाबत अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नसून, आघाडीचे भिजत घोंगडे कायम असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीची गणित भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र येणार का यावरती बऱ्यापैकी अवलंबून आहे. सामाजिक समीकरण पाहता महायुतीमधील फूट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळेच महायुतीचा निर्णय झाल्यानंतरच महाविकास आघाडीदेखील ठोस निर्णयापर्यंत येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, महायुतीच्या विरोधात शहर विकास आघाडी स्थापन करण्याची शक्यता देखील काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी उबाठा करत असल्याची चर्चा आहे. महायुती होणार की महाविकास आघाडीत बिघाडी होणार, याकडे आता जालना शहराचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सध्याचे राजकारण
जालना शहरात एकमेकांविरोधात उभे टाकणारे आमदार अर्जुन खोतकर कैलास गोरंट्याल हे आता प्रतिस्पर्धी राहिले नाहीत. गोरंट्याल यांच्या भाजप-प्रवेशामुळे तेही महायुतीत सामील झाले आहेत. महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतरही महायुती एकत्र नाहीय. आता हे निवडणूक युतीत होणार की स्वबळावर हे अद्याप अनुत्तरित आहे. भाजपनंही याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याच टाळलं आहे. 65 जागांसाठी 500 इच्छुकांनी अर्ज घेतल्याचं सांगत भाजप युती झाली तर युती नाहीतर स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि भाजपला युतीचे प्रस्ताव पाठवले होते. राष्ट्रवादी युतीसाठी अनुकूल असल्याचा दावा शिवसेना करत आहे. पण भाजपचा प्रस्ताव अजून आलेला नाही. भाजपसोबत किंवा भाजपशिवाय निवडणूक लढू असा पवित्रा शिवसेनेनं घेतलाय.
महाविकास आघाडीत मोठी पडझड झाली असून कैलास गोरंट्याल यांनी 28 पैकी 23 नगरसेवक भाजपमध्ये नेले आहेत. जालन्यात राजेश टोपे यांचे फारसे वर्चस्व दिसत नसल्याने महापालिका निवडणुकांचा सामना महायुतीतच होण्याची शक्यता अधिक असल्याचा सांगितलं जातय.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. जालना महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 65 जागा असून त्यापैकी 33 जागा महिलांसाठी राखीव आहेत. शहरात 16 प्रभाग रचना करण्यात आली असून याच प्रभागांतून 65 नगरसेवक निवडून येणार आहेत.
अशी आहे जालना शहराची ओळख...
मराठवाड्यात जालना जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. स्टील इंडस्ट्रीमुळे बांधकामासाठी लागणारे स्टील राज्यभरातच नव्हे तर देशातील अनेक भागात जालना जिल्ह्यातून जाते. त्यामुळे या शहरात मोठी औद्योगिक उलाढाल पाहायला मिळते. सोबतच कृषीच्या दृष्टीने देखील जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. मोसंबीचं मोठ उत्पादन होत असून, दिल्लीपर्यंत जालना जिल्ह्याची मोसंबी विक्रीसाठी जाते. राजकीयदृष्ट्या देखील जालना नेहमी चर्चेत असतो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा म्हणून जालना ओळखला जातो.




















