Kolhapur Municipal Corporation Election: मी महान पराक्रमी आहे असं कुणी समजण्याचं कारण नाही; हसन मुश्रीफांचा सतेज पाटलांना खोचक टोला
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देताना तब्बल 35 नगरसेवक निवडून आणले. अवघ्या सहा जागांनी सत्ता हुकली. त्यामुळे महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी ते काठावरचं बहुमत आहे.

Hasan Mushrif on Satej Patil: कोल्हापूरमध्ये महायुती विरुद्ध एकटे सतेज पाटील असाच कोल्हापूर मनपासाठी सामना रंगला. या लढतीमध्ये सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देताना तब्बल 35 नगरसेवक निवडून आणले. अवघ्या सहा जागांनी सत्ता हुकली. त्यामुळे महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी ते काठावरचं बहुमत आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या कामगिरीची चर्चा कोल्हापूरसह अवघ्या राज्यांमध्ये रंगली आहे. दरम्यान, आता या कामगिरीवरूनच व त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र आणि सध्या राजकीय विरोधक असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना खोचक टोला लगावला.
पराक्रमी आहे असं कोणी समजायचं कारण नाही
हसन मुश्रीफ म्हणाले की, मी काही महान पराक्रमी आहे असं कोणी समजायचं कारण नाही. आज कोल्हापूर महापालिकेमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक उपस्थित होते. यावेळी निर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नगरसेवक निवडून आल्यानंतर आता काय करायला हवं, काय करायला नको याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुश्रीफ यांनी नेत्यांचे सुद्धा कान टोचले. मुश्रीफ म्हणाले की मी काही महान पराक्रमी आहे असं कोणी समजण्याच कारण नाही. त्यांची शहरांमध्ये सत्ता होती. शहरामध्ये त्यांचे संघटन आहे. त्यामुळे सतेज पाटलांना इतक्या जागा मिळाल्या आहेत. महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव होता तो आम्हाला जाणवला असल्याचं मुश्रीफ यांनी कबूल केलं. ते म्हणाले की, मात्र भविष्यामध्ये समन्वय चांगल्या पद्धतीने केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महायुती बदनाम व्हायला कुठलीही संधी द्यायची नाही
दरम्यान, कोल्हापुरात महायुतीमध्ये महापौर कोणत्या पक्षाचा करायचा हे वरिष्ठ नेते बसून ठरवतील असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर हद्दवाढ संदर्भात त्यांनी लवकरच तुम्हाला चांगली बातमी समजेल असे पुन्हा एकदा सुतोवाच केले. नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की पहिल्यांदा प्रभागातील नागरिकांशी संवाद साधा. पहिल्यांदा गटनेता निवडला गेला पाहिजे. महापालिकेमध्ये दररोज भानगडी असतात, त्यासाठी कमिट्या स्थापन केल्या पाहिजेत, महायुती बदनाम व्हायला कुठलीही संधी द्यायची नाही असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या




















