पणजी: गोवा विधानसभेची निवडणूक म्हणजे मिस्टर आणि मिसेसची निवडणूक, मिस्टर आणि मिसेस गोवा कॉन्टेस्ट किंवा जोडीदारांची तर निवडणूक नाही ना? असा सवाल केला जात आहे. कारण, विधानसभेच्या निवडणुकीत आतापर्यंत पाच जोड्या रिंगणात उतरल्या आहेत. गोवा विधानसभेतील आमदारांची संख्या 40 आहे. त्यामुळे यदा-कदाचित नवरा-बायकोला गोयंकरांनी पसंती दिल्यास पाच जोड्या विधानसभेत दिसणार आहेत. शिवाय, गोव्याच्या विधानसभेत फॅमिली राज देखील दिसणार आहे.


विश्विजीत राणे वाळपई मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर, तर त्यांच्या पत्नी विद्या राणे या पर्ये मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बाबूश मोन्सेरात पणजी आणि जेनिफर मोन्सेरात तालीगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतात. केपे मतदारसंघातून चंद्रकांत कवळेकर भाजप तिकिटावर विधानसभेच्या रिंगणार तर त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर सांगे मतदारसंघातून अपक्ष  म्हणून रिंगणात आहेत. 


किरण कांडोळकर हळदोणा तर त्यांच्या पत्नी कविता कांडोळकर थिवीम मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेच्या रिंगणात आहेत. मायकल लोबो हे कळंगुट तर त्यांच्या पत्नी दलियाना लोबो शिवोलीम मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. 


राजकारणात नवरा बायकोची जोडी काही नवीन नाही. पण, 40 आमदार संख्या असणाऱ्या गोव्यात या जोड्या विजयी झाल्यास 10 आमदार या पाच घरातील असणार आहेत.


गोव्याचं राजकारण हे अजब आहे. इथलं राजकारण, राजकीय उलाथापालथी आणि पक्षांतर बंदीचा कायदा झाल्यानंतर देखील त्यावर मार्ग गोव्यानं दाखवला. याबाबतचे किस्से गोव्याच्या राजकारणात अगदी सहजपणे सांगितले जातात. 
 
सध्या गोयंकर शांत आहे. राजकारणातील उलाथापालथी, पक्षांतर, घराणेशाहीचं राजकारण यावर तो व्यक्त होताना दिसत नाही. सर्व कसं अगदी सुशेगात सुरू आहे. पण, असं असलं तरी तो मतांमधून आपल्या भावना व्यक्त मात्र नक्की करणार. त्यावेळी त्यानं कुणाला स्वीकारलं, कुणाला नाकारलं. त्यानं आपलं मत कुणाच्या पारड्यात ते देखील काय विचार करून टाकलं असावं याचं उत्तर नक्की मिळणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :