Goa Election 2022 : देशात येऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच प्रत्येक राज्यात आपापलं अस्तित्व टिकवण्यासाठी सत्ताधारी आणि सत्तापालट करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसल्याचं दिसतंय. गोव्यातही विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. परंतु, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाराजीचे सूरही उमटताना दिसत आहेत. भाजपचे दिवंगत नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना भाजपनं पणजीतून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून पणजीतूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत भाजपला धक्का दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. भारतीय जनता पार्टी तर्फे आगामी गोवा विधानसभेचं तिकीट न मिळाल्यामुळं पार्सेकर नाराज होतेच. त्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी न करता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णयही घेतला आहे. 


भाजपला रामराम ठोकल्यानंतर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, ते मांद्रेम मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, पार्सेकर यांनी शनिवारी भाजप पक्षाचा राजीनामा दिला असून, पक्षातील सर्व पदांचाही त्याग केला आहे.


आगामी निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी 


माजी मुख्यमंत्री पार्सेकर हे 14 फेब्रुवारी रोजी गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष भाजपच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते. ते म्हणाले की, राजीनामा दिल्यानंतर त्यांनी इतर राजकीय पक्षांशी संपर्क साधला होता. परंतु, त्यांनी अखेर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, "मी लवकरच माझं नामांकन दाखल करणार आहे." दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर मांद्रेम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तिकीट न देण्यात आल्यामुळं नाराज होते. या मतदार संघात भाजपनं विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली आहे.


दयानंद सोपटे यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला


माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी 2002 ते 2017 दरम्यान, मांद्रेम मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. दयानंद सोपटे यांनी 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून पार्सेकर यांचा पराभव केला होता. परंतु, सोपते यांनी 2019 मध्ये नऊ इतर नेत्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पार्सेकर 2014 ते 2017 दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर पार्सेकर यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा