पणजी : गोव्याची सत्ता भाजपकडेच राहणार असा दावा करत भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. पण, भाजपला बंडखोरीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या बंडखोरांना थोपवण्यात भाजप यशस्वी होणार का? असा सवाल आता विचारला जात आहे. आप आणि तृणमुलच्या एन्ट्रीचा फायदा नेमका कुणाला होणार हे येत्या निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. 


गोव्यामध्ये भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. 40 आमदार संख्या असलेल्या गोव्यात बहुमताचा आकडा हा 21 आहे. पण, 2022 मध्ये आम्ही 22 जागा जिंकणार म्हणत भाजप रिंगण्त उतरली आहे. पण, बंडखोरांना थंड करणं भाजपला म्हणावं तसं जमत नाही. भाजपची पहिली यादी आली आणि ही बंडखोरी उफाळली. यामध्ये दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या मुलानं पणजीतून बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.


माजी मुख्यमंत्री आणि भाजपचा जुना नेता अशी ओळख असलेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उमेदवारी न मिळाल्यानं मांद्रे मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री मायकल लोबो यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते कळंगुट मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. सावर्डे मतदारसंघातून दिपक पावसकर, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर सांगे मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत. तर इजितोर फर्नांडीस या काणकोण मतदारसंघामधून अपक्ष लढणार आहेत. साळगावमधून उमेदवारी न दिल्यानं नाराज असलेल्या दिलीप परूळेकर यांना भाजपने उपाध्यक्षपदी वर्णी लावत त्यांना शांत केलं आहे.


गोव्याच्या 40 विधानसभा मतदार संघात एक आमदारदेखील महत्त्वाचा असतो. अशा वेळी भाजमध्ये गोव्यातील बड्या नेत्यांनी केलेली बंडखोरी भाजपसमोर किती आव्हान निर्माण करणार याची राजकीय चर्चा होणारच. 


केवळ भाजपच नाही तर गोव्याच्या राजकारणातही मोठ्या उलथापलाथी झाल्या आहेत. प्रत्येक पक्षानं पूर्ण ताकद पणाला लावत निवडणुकीची तयारी केली आहे. पण त्या तुलनेत केंद्रात सत्ता असलेल्या भाजपचं गोव्यासारख्या छोट्या राज्यातील कामगिरीकडे लक्ष असणं स्वाभाविक आहे. 


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्रातील आमदार, खासदारांसह 40 नेते गोव्यात तळ ठोकून आहेत. एकीकडे आम्हाला बंडखोरांचा धोका नाही असं भाजप म्हणत असलं तरी दुसरीकडे त्यांची मनधरणी देखील सुरू आहे. अर्थात त्याला किती यश येतं हे देखील पाहावं लागणार आहे. शिवाय, निकाल लागल्यानंतर या बंडखोरांचा नेमका फायदा आणि तोटा कुणाला झाला हे देखील कळणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :