सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी फडणवीसांच्या 'या' तरुण सहकाऱ्याला संधी; मंत्रिपदाचीही शक्यता
Solapur Election 2024: सोलापूर जिल्ह्यात महायुतीला बसलेला फटका दुरुस्त करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालून पॅचअप करायच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
![सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी फडणवीसांच्या 'या' तरुण सहकाऱ्याला संधी; मंत्रिपदाचीही शक्यता Devendra Fadnavis give opportunity to young colleague Samadhan Avtade to prevent political collapse in Solapur district maharashtra politics marathi news सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी फडणवीसांच्या 'या' तरुण सहकाऱ्याला संधी; मंत्रिपदाचीही शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/1e639e13bd85e4fe5cd86579e3d6c2911732539778114892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Assembly Election 2024 सोलापूर : राज्यात भाजप आणि महायुतीची सुनामी आलेली असताना सोलापूर जिल्ह्याने मात्र महाविकास आघाडीला 11 पैकी सहा जागा देत आपण शरद पवार यांच्या मागे असल्याचे दाखवून दिले होते. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजप आणि महायुतीला बसलेला फटका दुरुस्त करण्यासाठी आता पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालून पॅचअप करायच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांकडून 'या' तरुण सहकाऱ्याला संधी?
अक्कलकोट पासून सोलापूरपर्यंत भाजपने क्लीन स्वीप घेत काँग्रेसचा सुपडा साफ केला. मात्र ग्रामीण भागात मोहोळपासून सांगोल्यापर्यंत शरद पवार गटाने महायुतीला आसमान दाखवल्याचे चित्र आहे. यात मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस ह्या चार मतदारसंघात शरद पवार गटाने दणदणीत विजय मिळविला तर बार्शीमध्ये ठाकरे गटाचे दिलीप सोपल आणि सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवत महायुतीला दे धक्का दिला. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महायुतीचा झालेला सफाया भाजपासाठी चिंतेचा विषय बनला असून पुन्हा एकदा या सहा मतदारसंघात नव्याने बांधणे करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समाधान आवताडे यांच्यावर ही जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू
समाधान आवताडे हे मराठा समाजातील तरुण आणि संघटन कौशल्य असलेले आमदार असल्याने माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस आणि बार्शी या ठिकाणी ते पुन्हा एकदा पक्षाला नवसंजीवनी मिळवून देतील, असा भाजपचा विश्वास आहे. समाधान आवताडे यांचा दांडगा जनसंपर्क आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची त्यांची पद्धत यामुळे पुन्हा एकदा या सहा मतदारसंघात पक्षाची बांधणी मजबूत होऊ शकणार आहे. अवताडे यांच्यासमोर मोहिते पाटील यांचे मोठे आव्हान असले तरी त्याला तोंड देण्याची ताकद त्यांच्यात असल्याने ते भाजपासाठी कोणालाही भिडू शकतात, याचा विश्वास पक्षाला आहे. त्यामुळेच आता होणाऱ्या मंत्रिमंडळ रचनेत सोलापूर जिल्ह्यातून समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. समाधान आवताडे हे 2021 साली पहिल्यांदा पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा पराभव करून निवडून आले होते. कालच्या निकालातही त्यांनी पुन्हा एकदा भगीरथ भालके यांना आसमान दाखवत दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
समाधान अवताडेंचे संघटन कौशल्य जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखेल?
सोलापूर जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याही नावाची चर्चा असली तरी ग्रामीण भागात अवताडे जास्त परिणामकारक ठरू शकतील असे भाजप निरीक्षकांचे मत आहे. यावेळी 11 पैकी सहा जागा महाविकास आघाडीने घेत भाजपाला आणि महायुतीला दे धक्का केला असून यात महायुतीला साथ देणारे सर्व सहा विद्यमान आमदारांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती . आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापालिक या निवडणुक डोळ्यासमोर ठेवून भाजप पावले टाकू लागली असून पक्षाचे लक्ष 2019 ला गमावलेल्या दोन्ही लोकसभेच्या जागा पुन्हा मिळवण्याचे मुख्य लक्ष आहे. अशावेळी बहुजन चेहरा देताना सर्वांना सोबत घेऊन जाईल अशा व्यक्तीचा विचार पक्ष करीत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यात नवीन सरकार येणे अपेक्षित असून यामध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी देताना अवताडे यांच्या नावाचा विचार होईल असे सूत्रांचे सांगणे आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)