गडकरी, फडणवीस विरोधात लढलो, त्यांच्यापेक्षा मोठा उमेदवार भाजप कुठून आणणार? काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा सवाल
West Nagpur : देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी विरोधात लढलो. यांच्यापेक्षा आणखी मोठा उमेदवार भाजप माझ्या विरोधात कुठून आणणार? असे सांगून विकास ठाकरे यांनी भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांची खिल्ली उडवली आहे.
Nagpur News नागपूर : दोन वेळेला देवेंद्र फडणवीस विरोधात, एक वेळेला नितीन गडकरी विरोधात लढलो. यांच्यापेक्षा आणखी मोठा उमेदवार भाजप माझ्या विरोधात कुठून आणणार? असे सांगून विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी पश्चिम नागपूर त्यांच्या विरोधातील भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांची खिल्ली उडवली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवार पूर्ण शक्तीने प्रचाराला उतरले असताना पश्चिम नागपुरात (West Nagpur Assembly Constituency) विद्यमान काँग्रेस आमदार आणि यंदाचे उमेदवार विकास ठाकरे ही जोरदार प्रचार करत आहे.
नितीन गडकरी विरोधात 22000 मतांनी त्यांचं लीड कमी करून दाखवल
लोकसभेला ही नितीन गडकरी माझ्या विरोधात लढले होते, तेव्हा मी त्यांची लीड पश्चिम नागपुरात 22000 मतांनी कमी करून दाखवली. तेव्हा तर मी पश्चिम नागपुरात लक्ष न घालता ती लीड कमी केली. तर आता मी पश्चिम नागपुरातून निवडणूक लढवत असताना काय होईल याचा अंदाज तुम्ही स्वतःच लावून घ्या, असेही विकास ठाकरे म्हणाले. नितीन गडकरींनी आता पश्चिम नागपुरात कितीही लक्ष घातले तरी काहीही होणार नाही, असा दावा ही त्यांनी केला. पाचही वर्ष माझा प्रचार सुरू असतो, जनतेच्या सतत संपर्कात असतो, त्यामुळे आता फारसा प्रचार करायची गरज ही नाही, असे सांगून विकास ठाकरे यांनी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
माझं घर आधी पश्चिम नागपुरातच होतं, तो डीलिमिटेशन झाल्यामुळे पश्चिम नागपूरच्या बाहेर गेलं. त्यामुळे घर जरी बाहेर असलं तरी मनाने मी पश्चिम नागपूरचा आहे. भाजपकडे माझ्या विरोधात उमेदवार नव्हता. म्हणून ते बाहेरचा उमेदवार आणून मला बाहेरील सांगत आहे, असं ही ठाकरे म्हणाले.
मी काय पाकिस्तान मधून आलेला उमेदवार आहे का?
मी काय पाकिस्तान मधून आलेला उमेदवार आहे का? मी नागपूरचा रहिवाशी असून पश्चिम नागपूरमधून पक्ष आदेशावर निवडणूक लढवत असल्याची प्रतिक्रिया पश्चिम नागपूरमधील भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी दिली आहे. सुधाकर कोहळे पश्चिम नागपूरसाठी भाजपचे उमेदवार असून त्यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून विरोधी पक्षाकडून (काँग्रेसकडून) आरोप केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सुधाकर कोहळे यांनी मी पाकिस्तान मधून आलेला उमेदवार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम नागपूर मधील विद्यमान आमदार आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे हे सुद्धा पश्चिम नागपूरच्या बाहेरचे रहिवाशी असून ते दक्षिण पश्चिम नागपूर मध्ये राहतात आणि पश्चिम नागपूर मध्ये निवडणूक लढवतात, असे असताना काँग्रेस मला बाहेरचा उमेदवार कसं म्हणू शकतं? असा सवाल ही सुधाकर कोहळे यांनी विचारला आहे. तर पश्चिम नागपूर मध्ये भाजपचा विजय होईल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.