BMC Election : भाजपच्या मुंबईतील पहिल्या उमेदवार यादीबाबत मोठी अपडेट, नाराजी टाळण्यासाठी रणनीती, आमदारांवर जबाबदारी
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत नाराजी अन् बंडाचा धोका टाळण्यासाठी भाजपनं विशेष रणनीती राबवत आमदारांवर जबाबदारी दिली आहे.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस बाकी राहिले आहेत. भाजपकडून उद्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्रित निवडणूक लढणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्र उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे कार्यककर्ते नाराज होतील, त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदारांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती आहे.
BJP : भाजपकडून आमदारांवर विशेष जबाबदारी
भाजपकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदारांवर असणार आहे. मुंबई महापालिकेसाठी पार पडलेल्या भाजपच्या उच्चस्तरीय कोअर कमिटीच्या बैठकीत आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजपची उद्या पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. मुंबई पालिकेसाठीच्या निवडणूक तयारीचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला सोबतच, छोट्या प्रचार सभा, घरोघरी जात मतदारांना संपर्क करत भेटीगाठी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपकडून जिल्हाध्यक्षांना उमेदवारांचे फॉर्म तपासून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पहिल्या यादीत अडचणी नसलेल्या वॉर्डचे उमेदवार भाजपकडून घोषित केले जाणार आहेत. दरम्यान, अडचणी असलेल्या वॉर्ड्स संदर्भात वेट ॲंड वॉच धोरण राबवत बंडखोरांना वेळ न देण्याची भाजपची स्ट्रॅटर्जी आहे.
भाजपची पाच नावं समोर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्विनी घोसाळकर या प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातील उमेदवारांची नावं देखील समोर आली आहेत. मुंबई महापालिकेसाठी मलबार हिल मतदारसंघातील चार नावं निश्चित झाली आहेत. वॉर्ड 215 साठी संतोष ढाले, 218 साठी स्नेहल तेंडुलकर, 214 मधून अजय पाटील तर 219 मधून सन्नी सानप उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या चारही भाजपचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी राहिला असला तरी महायुतीत भाजप आणि शिवसेना किती जागांवर लढणार हे समोर आलेलं नाही. भाजप आणि शिवसेनेची 207 जागांवर सहमती झाल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026





















