मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत भाजपनं 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 99 नावांचा समावेश होता. दोन्ही याद्यांची बेरीज केली असता भाजपनं आतापर्यंत 121 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपकडून पुण्यातील तीन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये खडकवासला, कसबा पेठ आणि पुणे छावणी या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपनं खडकवासला येथून भीमराव तापकीर, कसबा पेठ येथून हेमंत रासने आणि पुणे छावणी मतदारसंघातून सुनील कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 


कसबा पेठेत पुन्हा एकदा धंगेकर विरुद्ध  रासने 


कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. कसबा पेठेतून मविआचे उमेदवार म्हणून रविंद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. आता त्याच मतदारसंघात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना तर भाजपकडून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानं  कसब्यात पुन्हा रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळेल. 


पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अनेक इच्छुकांची रांग लागली होती. यात शहराध्यक्ष धीरज घाटे त्यानंतर मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच धीरज घाटे यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं. कारण कसब्यात ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे धीरज घाटे यांना उमेदवारी मिळणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याहीवेळी हेमंत रासने यांना कसबा विधानसभा मतदारसंघाचा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे


खडकवासला आणि पुणे छावणीत विद्यमान आमदारांना पुन्हा संधी 


भाजपनं खडकावसला  विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा भीमराव तापकीर विरुद्ध सचिन दोडके यांच्यात लढत होणार आहे. सचिन दोडके यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून उमेदवारी देण्यात आली आहे.पुणे छावणी विधानसभा मतदारसंघात भाजपनं सुनील कांबळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.  


भाजपकडून आतापर्यंत 121 उमेदवार जाहीर


महायुतीमध्ये भाजप 153 जागा लढवू शकतो, अशी शक्यता आहे. भाजपकडून आतापर्यंत 121 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. महायुतीत भाजपचे मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 जागा मिळतील, अशी शक्यता आहे. 


भाजपची आणखी एक यादी येणार


महायुतीत भाजप 153 जागा लढवणार असल्याची चर्चा असल्यानं भाजपकडून अजून 32  विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करु शकते. भाजपनं पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली होती. दुसऱ्या यादीतदेखील बऱ्याच विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. 


इतर बातम्या : 


भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात