मुंबई : अब्जाधीश आणि देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश हळहळला. राजकीय नेते, अभिनेते तसेच समस्त भारतवासीयांनी त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले. अब्जाधीश असूनही त्याच्या वागण्यातील साधेपणा, त्यांचे प्राण्यांवरील प्रेम अशा अनेक बाबींमुळे रतन टाटा यांची नेहमीच चर्चा व्हायची. दरम्यान, रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कित्येक कोटींच्या संपत्तीचे काय होणार? असे विचारले जात होते. असे असतानाच आता टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात केलेल्या तरतुदी समोर आल्या आहेत. त्यांनी मृत्यूपत्रात केलेल्या तरतुदी पाहून पुन्हा एकदा अनेकांच्या मनात रतन टाटा यांचे स्थान पुन्हा एकदा उंचावले आहे. 


रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात लाडक्या कुत्र्याचा समावेश 


रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात केलेल्या तरतुदी समोर आल्या आहेत.  मृत्यूपत्र आता समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार रतन टाटा एकूण 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेले आहेत. रतन टाटा यांनी आपला तरुण मित्र शांतनू नायडू याचाही मृत्यूपत्रात उल्लेख केला आहे. यासह त्यांनी त्यांचा आवडता कुत्रा 'टीटो' याचाही उल्लेख केला आहे. सोबतच सावत्र भाऊ जिम्मी टाटा, सावत्र बहीण शरीन तसेच डिएना जीजीभॉय यांचाही उल्लेख करण्यात आलाय. रतन टाटा मृत्यूपत्रात त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांचाही उल्लेख करण्यास विसरलेले नाहीत. 


शांतनू नायडूसाठी मोठी तरतूद


मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा यांनी गुडफेलोज या स्टार्टअपमध्ये असलेली हस्सेदारी शांतनू नायडूसाठी सोडली आहे. सोबतच शांतनू नायडूने पदेशातील शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्याचाही उल्लेख टाटा यांच्या मृत्यूपत्रात आहे. शांतनू नायडू हा रतन टाटा यांचा सर्वांत विश्वासू मित्रांपैकी एक होता. रतन टाटा आणि शांतनू नायडू या दोघांचेही प्राण्यांवर खूप प्रेम आहे. याच कारणामुळे दोघांमध्ये मैत्री झाली होती. 


टीटो नावाच्या कुत्र्यासाठी विशेष तरतूद 


रतन टाटा यांनी पाळलेला टीटो नावाचा एक कुत्रा आहे. त्यांना हा कुत्रा फार आवडायचा. त्याची काळजी घेण्याचाही उल्लेख रतन टाटा यांनी आपल्या मृत्यूपत्रात केला आहे. या कुत्र्याची अनलिमिटेड केअर करावी, असं त्यांनी म्हटलंय. टाटा यांनी टीटो या कुत्र्याला पाच तेस हा वर्षांपूर्वी आणलं होतं. टीटो या कुत्र्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी राजन शॉ या शेफवर (स्वयंपाकी) सोपवली आहे.


रतन टाटा यांच्या नावावर किती संपत्ती?


मृत्यूपत्रात रतन टाटा यांनी त्यांच्या संपत्तीच्या वाटपाची जबाबदारी सावत्र बहीण शिरीन, डायना जीजीभॉय,  वकील दारायस खंबाटा,  जवळचे मित्र मेहली मिस्त्री यांच्यावर सोपवली आहे. रतन टाटा यांच्या नावावर कोट्यवधीची संपत्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलिबागमध्ये त्यांचा एक 2000 स्क्वेअर फुटांचा बंगला आहे. मुंबईतील जुहू तारा रोडवर दोन मजली घर आहे. 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये फिक्स्ड डिपॉझिट आहेत. टाटा सन्समध्ये रतन टाटा यांची 0.83 टक्के हिस्सेदारी आहे. ही संपूर्ण हिस्सेदारी रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनला (RTEF)  जाणारा आहे. रतन टाटा यांच्याकडे एकूण 20 ते 30 आलिशान कार होत्या. रतन टाटा यांचा कोलाबा येथे हेलेकाई हाउस नावाचा बंगला आहे. या बंगल्याचा मालकी हक्क ईवॉर्ट इन्व्हेस्टमेंट या कंपनीजवळ आहे. ही कंपनी टाटा सन्सची अपकंपनी आहे.  


हेही वाचा :


Ratan Tata : टाटा उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या रतन टाटा यांचा पगार किती होता? एका मिनिटाला मिळायचे तब्बल 'इतके' रुपये?


रतन टाटा यांचा उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांचीच निवड का? 'हे' आहेत त्यांचं सामर्थ्य दाखवणारे पाच पुरावे!


Ratan Tata Speech: तुम्हाला संदेश द्यायचाय तो मनातून आलेला असेल, रतन टाटा यांचं 'ते' भाषण ऐकून पंतप्रधान मोदींनी वाजवलेल्या टाळ्या