BJP candidate list: मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 22 उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी, 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपच्या (BJP) दुसऱ्या यादीतही देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मर्जीतील नेत्यांनाच संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत भाजच्या दुसऱ्या यादीत जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून अकोल्यातून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यासह, पुण्यातील तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान औताडे यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे, प्रशांत परिचारक यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपने जारी केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये विदर्भातील 9 मतदार संघाचा समावेश आहे. तर, पुण्यातून तीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, भाजपच्या दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही नाव नाही. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जत जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांनी पेठे भरवून अभिनंदन केले.
महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेंच सुरु आहे. महाविकास आघाडीतही अनेक जागांवरुन खल सुरु आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. पुढील फॉर्म्युल्यानुसार महायुती निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपात पुन्हा एकदा भाजपकडून 9 आकड्याचे गणित जुळण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजप मुंबईत 18 जागा लढवणार आहे. भाजपकडून 14 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत, तर अद्यापही 4 जागांवर उमेदवार निश्चिती बाकी आहे.