महाराष्ट्रात एमआयएनं 125 जागा जिंकल्या, असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, विजयी नगरसेवकांना महत्त्वाची गोष्ट सांगितली...
BMC Elections Results: महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत एमआयएमनं 125 जागांवर विजय मिळवला आहे. या कामगिरीवर पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हैदराबाद : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमनं खातं उघडलं आहे. एमआयएमनं 13 महापालिकांमध्ये 125 जागा जिंकवून आणल्या आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी ही कामगिरी ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. भाजप किंवा विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत जाणार नसल्याचं ओवेसींनी स्पष्ट केलं. ओवेसींनी म्हटलं की आमची लढाई आम्हाला जनादेश देणाऱ्यांसाठी असेल, सत्तेच्या समीकरणाची नसेल.
असदुद्दीन ओवेसींनी हैदराबादमध्ये आज सकाळी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विजयाचं श्रेय कार्यकर्ते आणि मतदारांना दिलं. एमआयएम केवळ एका वर्गाची पार्टी राहिली नाही, असं ओवेसांनी म्हटलं. ते म्हणाले की, मी अल्लाहचे आभार मानतो, आमच्या काही हिंदू भाऊ, ज्यामध्ये दलित, अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमातीचे उमेदवार आहेत, ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जिंकले आहेत.
एमआयएमनं छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 जागा जिंकल्या आहेत. सोलापूरमध्ये देखील एमआयएम भाजपनंतर दुसरा पक्ष ठरला आहे. मुंबई महापालिकेत एमआयएमच्या 8 जागा निवडून आल्या आहेत.
असदुद्दीन ओवेसी यांनी विरोधी पक्षांकडून केल्या जाणाऱ्या बी-टीमच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले या आरोपांवर माझ्याकडे काही उत्तर नाही. जे लोक बी टीम म्हणतात ते आम्हाला मतदान करणाऱ्या लाखो मतदारांचा अपमान करत आहेत. जर तुम्ही जनादेशाचा अपमान कराल तर तुमचं नुकसान नक्की आहे, असं असदुद्दीन ओवेसींनी म्हटलं.
अकोट नगरपालिकेत जी घटना घडली त्याचा दाखला देत कोणत्याही ठिकाणी अशा गटात भाजप सहभागी असेल त्याचा भाग होऊ नका असे आदेश असदुद्दीन ओवेसी यांनी दिले आहेत. पक्षात शिस्त सर्वात महत्त्वाची आहे. यापूर्वी इम्तियाज जलील यांनी एका उमेदवाराला भाजप उमेदवाराचं समर्थन केल्यानं निलंबित केल्याचं देखील ओवेसींनी म्हटलं.
पश्चिम महाराष्ट्रातील पराभवावर ओवेसी काय म्हणाले?
पश्चिम महाराष्ट्रात अधिक लक्ष देऊ शकलो नाही ही गोष्ट स्वीकारत असल्याचं देखील असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात अधिक वेळ दिला असता तर इथं संख्या आणखी वाढली असती. ओवेसी यांनी विजयी झालेल्या उमेदवारांची जबाबदारी वाढल्याचं देखील म्हटलं. विजयी झालेल्या सर्व नगरसेवकांनी लोकांची सेवा करावी, विजयानं हुरळून जाऊ नये, असं म्हटलं.
महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुका दीर्घकाळानंतर जानेवारी 2026 मध्ये पार पडल्या. ही निवडणूक 2029 च्या विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट मानली जात आहे. एमआयएमनं गेल्या वेळी 56 जागा जिंकल्या होत्या. यावेळी एमआयएमनं महाराष्ट्रात 13 महापालिकांमध्ये 125 जागा जिंकल्या आहेत.




















