Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जरी महायुतीचे वरिष्ठ नेते मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असा दावा करत असले तरी विदर्भातील वरुड मोर्शी या विधानसभा (Warud Morshi Vidhan Sabha) मतदारसंघात तशीच स्थिती निर्माण झाली आहे. वरुड मोर्शीचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार(Devendra Bhuyar) यांनी काही दिवसांपूर्वी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. तर आज देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याकडून त्यांना ए बी फॉर्म मिळाल्याचा दावा केला आहे.


वरुड मोर्शी महायुती मधील मैत्रीपूर्ण लढतीचा केंद्र?


तर दुसऱ्या बाजूला वरुड मोर्शी मधील भाजप नेते उमेश यावलकर यांचाही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेणाऱ्या उमेश यावलकर यांचा दावा आहे की भाजपने त्यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दावेदार फक्त दावेदारीच करत नाही आहे. तर त्यांच्या पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिल्याचा दावाही करत आहे. त्यामुळे वरुड मोर्शी महायुती मधील मैत्रीपूर्ण लढतीचा केंद्र बनेल आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


देवेंद्र भुयार यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवण्याच्यादृष्टीने अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, पहिल्या दोन उमेदवारी याद्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे देवेंद्र भुयार मुंबईत ठाण मांडून बसले होते. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने देवेंद्र भुयार नाराज होऊन माघारी परतले होते. यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला 'उमेदवारी अर्ज भरायला चला', असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे देवेंद्र भुयार अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असे दिसत होते. मात्र, अजितदादा गटाकडून त्यांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला.


A, B  फॉर्म म्हणजे काय?


केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार विधानसभा किंवा लोकसभेत एखाद्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज करायचा असेल तर त्याची खासगी माहिती आणि तो कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. यासाठी त्याला दोन स्वतंत्र फॉर्म भरावे लागतात. यातील पहिला फॉर्म हा A आणि दुसऱ्या फॉर्मला B असे संबोधले जाते. याला एकत्रित AB फॉर्म संबोधले जाते. AB फॉर्म भरणाऱ्या उमेदवाराला त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजले जाते. त्यामुळं हा फॉर्म भरणं महत्वाचं समजलं जातं.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते केवळ आमचे राजकीय शत्रू; संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा


मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात