(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP C Voter Survey: काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा कुणाला होणार फायदा? पाहा जनतेचा कौल
ABP News C Voter Survey :पंजाब काँग्रेस वारंवार पक्षामध्ये सर्वकाही ठीक असल्याचे स्पष्टीकरण देत आहे, पण पडद्याच्या मागील घडामोडी वेगाने घडत आहे. मुख्यमंत्री पदावरुन पक्षात फूट पडल्याचे बोललं जात आहे.
ABP News C Voter Survey for Punjab : पंजाबमधील निवडणूक प्रचार रंगात आला आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय समीकरणेही बदलत आहेत. प्रत्येक पक्ष प्रचारामध्ये व्यस्त आहे. सत्ताधारी काँग्रेसनेही जोरदार प्रचार सुरु केला आहे. अशातच पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याच्या बातम्याही समोर येत आहे. पंजाब काँग्रेस वारंवार पक्षामध्ये सर्वकाही ठीक असल्याचे स्पष्टीकरण देत आहे, पण पडद्याच्या मागील घडामोडी वेगाने घडत आहे. मुख्यमंत्री पदावरुन पक्षात फूट पडल्याचे बोललं जात आहे.
नवजोत सिंह सिद्धू (Navjot Sidhu) आणि चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Channi) यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरुन कलह असल्याचे बोललं जात आहे. पंजाबमधील निवडणूका आणि काँग्रेस पक्षातील कलह याची राजकीय चर्चा होत आहे. पंजाबमधील कलहाचा इतर पक्षाला फायदा होईल का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळेच एबीपीने सी वोटरच्या मदतीने सर्व्हे केला आहे. यामध्ये जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसमधील वादाचा कुणाला फायदा होईल? असा प्रश्न सी वोटरच्या सर्व्हेमध्ये विचाऱण्यात आला होता. यामध्ये जनतेने धक्कादायक उत्तर दिलं आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या 50 टक्के लोकांना वाटतेय की, काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फायदा आम आदमी पार्टीला होईल. तर 22 टक्के लोकांना वाटतेय की, अकाली दलला याचा फायदा होईल. तर 14 टक्के लोकांनी भाजपच्या बाजूने मत दिलेय. 14 टक्के लोकांनी माहित नाही, हा पर्याय निवडला आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा कुणाला फायदा होणार?
आप 50%
अकाली 22%
भाजप 14%
माहित नाही 14%
पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली, 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला होणार मतदान
पंजाबमध्ये 16 फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती असल्याने 14 फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक आता 20 फेब्रुवारीला होणार आहे. मतदानाची तारीख पुढे ढकलली असली तरी 10 मार्च रोजी ठरल्यानुसार मतमोजणी होणार आहे. पंजाब विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेततला होता. परंतु, रविदास यांची जयंती असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी पंजाबमधील अनेक राजकीय पक्षांनी केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, आम आदमी पक्ष, भाजप, अकाली दल आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. 16 फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती असल्यामुळे पंजाबमधील लाखो लोक वाराणसीला जातात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार. अनेक मतदारांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदानाची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी या पक्षांनी केली होती. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.