2024 Vidhansabha Election In Maharashtra, Navi Mumbai : बेलापूर विधानसभा उमेदवारी वरून भाजपातील मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.  भाजप नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी आज सीबीडी येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करून राजकीय वातावरण तापवले आहे. ऐरोली विधानसभेत आमदार राहिलेल्या संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभेत जनसंपर्क कार्यालय उघडून आपण उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या बेलापूर विधानसभेत भाजपाकडून मंदा म्हात्रे विद्यमान आमदार आहेत. मात्र यानंतरही गेल्या काही दिवसापासून याच मतदारसंघात संदीप नाईक यांनी कार्यक्रमांचा धडाका लावून एक प्रकारे प्रचाराची सुरुवात केली आहे. संदीप नाईक हेच बेलापूर विधानसभेतील उमेदवार असतील अशा पोस्ट त्यांचे कार्यकर्ते सोशल मिडीयातून व्हायरल करीत असल्याने नाईक विरूध्द म्हात्रे असा संघर्ष अटळ झाला आहे.


सध्या भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदाची धुरा संभाळणारे संदीप नाईक हे या आधी ऐरोली विधानसभेतून दोन वेळा राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार म्हणून निवडून गेले होते. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडवर गणेश नाईक परिवाराने शरद पवार यांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला होता. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभेतून संदीप नाईक आणि बेलापूर विधानसभेतून गणेश नाईक यांना उमेदवारी मिळेल अशी आशा नाईकांना होती. मात्र भाजपाने विद्यमान आमदार असलेल्या मंदा म्हात्रे यांना बेलापूर विधानसभेत दुसऱ्यांदा तिकिट देत गणेश नाईकांना डावलले होते. ऐरोलीतून संदीप नाईक यांची उमेदवारी कायम ठेवली होती. मात्र आपल्या जागी वडील गणेश नाईक यांनी लढावे असा आग्रह धरत संदीप नाईक यांनी आमदराकीची होणारी ‘ हॅट्रीक ‘ वर पाणी सोडले होते.


यावेळी मात्र 2024 ला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी संदीप नाईकांनी आमदारकीसाठी शड्डू ठोकला आहे. यासाठी मैदान निवडलय बेलापूर विधानसभा. बेलापूर विधानसभेत गेल्या काही दिवसापासून संदीप नाईक यांनी कार्यक्रमांचा धडाका लावला असून पक्षाचे जुने जाणत्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. भाजपाचे जनसंपर्क कार्यालय सीबीडी येथे सुरू केले आहे. सीबीडी येथे सर्वच शासकीय यंत्रणांचे मुख्य कार्यालये असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांची कामे होण्यासाठी मदत मिळावी यासाठी सीबीडी येथे कार्यालय सुरू केल्याचे संदीप नाईक यांनी भाषणातून सांगितले. मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असून पक्षाच्या वाढीसाठी शहरात सर्वच भागात कार्यरत राहणे माझे कर्तव्य असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.


संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभेबाबतच्या उमेदवारीवरून भाष्य करण्याचे टाळले असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोशल मिडीयातून आक्रमक प्रचार करीत बेलापूर मधील आमदार संदीप नाईक असे संदेश व्हायरल केले जात आहेत. गणेश नाईकांनी मात्र याबाबत भाष्य करीत कोणत्या विधानसभेत कुणाला उमेदवारी द्यायचे हे वरिष्ठ ठरवतील असे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.


आणखी वाचा :


महायुतीच्या दोस्तांमध्येच कुस्ती होणार? ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात शिवसेना-भाजप आमनेसामने!