2024 Vidhansabha Election In Maharashtra : विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली असल्याने राजकीय वारे तापू लागले आहे. लोकसभेनंतर विधानसभेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी नवी मुंबईतील सर्वच पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा नवी मुंबई शहरात आहेत. या दोन्ही ठिकाणी महायुतीमधील ‘ दोस्ती ‘ मध्येच ‘कुस्ती‘ लागण्याची दाट शक्यता आहे.


ऐरोली विधानसभेत भाजपाकडून गणेश नाईक तर बेलापूर विधानसभेत भाजपाच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. 2019 रोजी झालेल्या युतीमुळे हे दोन्ही मतदार संघ भाजपाला सोडताना शिवसेनेच्या स्थानित नेत्यांनी ग्रीन सिग्नल देत प्रामाणिक काम केले होते. मात्र या वेळची परिस्थिती नेमकी उलटी झाली असून या दोन्ही विधानसभेवर शिवसेनेच्या नेत्यांनी दावा केला आहे. लोकसभेला खासदार नरेश म्हस्के यांना दोन्ही मतदार संघातून लीड मिळालेले आहे. हे लीड महायुतीमधील पक्षांमुळे नाही तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच मिळाले असल्याचे शिवसेनेचे नेते खासगीत सांगत आहेत. यामुळेच ऐरोली विधानसभेवर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि बेलापूर विधानसभेत उपनेते विजय नाहटा यांनी दावा केला आहे.


एकीकडे भाजपाच्या उमेदवारांना शिवसेनेच्या उमेदवारांची स्पर्धा करावी लागत असतानाच दुसरीकडे भाजपातच नाईक विरूध्द म्हात्रे हा संघर्ष संपता संपेना झालाय. बेलापूर विधानसभेत भाजपाकडून मंदा म्हात्रे आमदार असतानाही भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी कामाला सुरवात केली आहे. प्रत्येक निवडणूकीत कोपरखैरणेतून मतदान करणाऱ्या संदीप नाईकांनी या लोकसभेत बेलापूर मतदार संघात आपले नाव नोंदवून मतदान केले. संपूर्ण नाईक परिवार कोपरखैरणे मध्ये मतदानांच्या रांगेत उभा असताना संदीप नाईक यांनी सीबीडी येथे मतदान करून आपण बेलापूर विधानसभेतून इच्छूक असल्याचे संकेत दिले होते. सीबीडी सेक्टर 15 येथे भाजप कार्यालयाचे उदघाटन करून संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभेत शड्डू ठोकला आहे.


भाजप मधील  जांगडगुत्ता  सुटत नसतानाच शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी सुध्दा यात उडी घेतली आहे. ‘ हीच ती योग्य वेळ’…. ‘अभी नही तो कभी नही’…. असा नारा देत कोणत्याही परिस्थितीत बेलापूर विधानसभा लढणारच असा ‘ शंक ‘ नाहटांनी पुकारलाय. यादृष्टीने त्यांनी कामास सुरवातही केली आहे. प्रत्येक प्रभागात स्वस्त दरात कांदे , पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यास सुरवात केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने नाहटा यांनी भाजपाचे जुने जाणते कार्यकर्ते, आरएसएस मधील स्वयंसेवकांशी जवळीक करण्याची संधी सोडलेली नाही. तिकडे ऐरोली विधानसभेतही महायुती मध्ये सर्व काही अलबेल नाही. शहरातील दोन्ही मतदार संघापैकी एकतरी विधानसभा शिवसेनेला सुटावी अशी मागणी विजय चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ऐरोली विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. लोकसभेत  चांगले मतदान ऐरोली भागात झाल्याने सेनेने दावा ठोकत भाजपा आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ केली आहे.


विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आवाहनापेक्षा महायुतीमधील नेत्यांचेच एकमेकांसमोर आव्हान उभे राहिले आहे. महायुतीतचे तिकिट मिळविण्यात कोण बाजी मारतोय… कोण पक्ष बदलतोय कि अपक्ष उभा राहून सांगली पॅटर्न घडवतोय.. हे येत्या काही दिवसातच कळेल.. पण नवी मुंबईत विधानसभेच्या फडात महायुतीच्या ‘  दोस्ती’ मध्येच ‘ कुस्ती ‘ मात्र नक्की रंगणार आहे.