मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता. यानंतर आता पुढील पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात महायुती आणि एनडीएची सत्ता असणार आहे. असे असताना निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस उलटले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. त्यातच महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर नेमकं कोण विराजमान होणार या वर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाहीय. तर दुसरीकडे या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) जोरदार तयारीला देखील सुरुवात झाली असून आता शपथविधी संदर्भात भाजपच्या गोटातही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 


भाजपच्या विश्वसनीय सूत्रांची माहितीनुसार, भाजपच्या विधीमंडळ गटनेते निवडीची प्रक्रिया उद्याच पार पडणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच भाजप विधीमंडळ गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री असणार, असे देखील सांगितलं जातंय. अशात, किती मंत्र्यांनी शपथ घ्यावी? हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्‍यांचा असेल. त्यामुळे मुख्यमंत्री निवडीनंतरच किती मंत्री शपथ घेणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. तूर्त काहीही ठरले नसल्याचे भाजपच्या गोटातून उघड झाले आहे. 


मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार? 


आमदार प्रसाद लाड, भाजप नेते मोहित कंबोज हे सुजाता सौनिक यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. सुरक्षा व्यवस्था आणि शपथ ग्रहण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी दोन्ही नेते सुजाता सौनिक यांच्या भेटीला पोहचत आहेत. VVIP आणि VIP यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील ते चर्चा करणार आहेत. दरम्यान, शपथविधीच्या दिवशी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच महायुतीचे काही आमदार देखील मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


भाजपची नेता निवड उद्या


भाजप विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक पार पडेल. त्यासाठी भाजपने निरीक्षक म्हणून नेमलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन या मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होतील. बुधवारी सकाळी 10 वाजता विधानभवनात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडेल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होईल, असे सांगितले जात आहे. यानंतर महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. 


सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर संपन्न होईल. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर, धर्मगुरु, संत-महंत उपस्थित राहणार आहेत. 


हे ही वाचा 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI