मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे. निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस उलटले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. त्यातच महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) जोरदार तयारीला देखील सुरुवात झाली असून आता शपथविधी संदर्भात मंत्रालयात मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
नव्या सरकारच्या शपथविधी संदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडत आहे. बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित आहेत. तर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सत्यनारायण चौधरी देखील बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार?
आमदार प्रसाद लाड, भाजप नेते मोहित कंबोज हे सुजाता सौनिक यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. सुरक्षा व्यवस्था आणि शपथ ग्रहण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी दोन्ही नेते सुजाता सौनिक यांच्या भेटीला पोहचत आहेत. VVIP आणि VIP यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील ते चर्चा करणार आहेत. दरम्यान, शपथविधीच्या दिवशी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच महायुतीचे काही आमदार देखील मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान मोदींसह बडे नेते शपथविधीला उपस्थित राहणार
दरम्यान, आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी समारंभाच्या पूर्वतयारीचा आढावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. अजित पवार गटाचे नेतेही यावेळी हजर होते. मात्र, शिंदेसेनेचा एकही नेता नव्हता. त्यामुळे शिंदेंची शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि मित्रपक्षशासित विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, विविध धार्मिक, आध्यात्मिक संत, गुरू उपस्थित राहणार आहेत. विविध देशांचे कौन्सुलेट जनरल, राज्यभरातून भाजप आणि मित्रपक्षांचे हजारो कार्यकर्ते येणार आहेत.
आणखी वाचा