मुंबई: महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही सुधारलेली नाही. एकनाथ शिंदे हे दरे या त्यांच्या मूळगावी गेले होते तेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती. यानंतर ते मुंबईत परतले होते. तरी त्यांची प्रकृती सुधारली नव्हती. सोमवारी रात्री भाजप नेते गिरीश महाजन त्यांना भेटायला आले तेव्हादेखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सलाईन लावण्यात आली होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारेल आणि ते मुंबईत येऊन बैठकांना हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मंगळवारी सकाळी हाती आलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांची तब्येत अद्यापही ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे.


एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत आहे. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक औषधे सुरु आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. परंतु, डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना तुर्तास आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ज्युपिटर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे मोजके नेते वगळता शिवसेनेच्या आमदारांना भेटलेले नाहीत. मात्र, बुधवारी सकाळी महाडचे आमदार भरत गोगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आज घरीच सर्वांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


महायुतीच्या नेत्यांकडून एकत्रितपणे शपथविधी स्थळाची पाहणी


महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला दुपारी 5 वाजता पार पडणार आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी सकाळी एकत्रितपणे आझाद मैदानातील शपथस्थळाची पाहणी केली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट, धनंजय मुंडे हे उपस्थित होते. 


भाजपचे केंद्रीय निरीक्षक संध्याकाळी मुंबईत येणार


भाजपचे केंद्रीय निरीक्षक आज सायंकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील काही तासांमध्ये मुंबईत पोहोचतील. विजय रुपाणी सायंकाळी 7.30 वाजता, तर निर्मला सीतारामन रात्री 9.30 वाजता मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये दोघे नेते वास्तव्यास असतील. दोन्ही निरीक्षक 4 डिसेंबरला भाजप आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाजप विधीमंडळ गटनेत्याची निवड होईल. 


आणखी वाचा


शिवसेनेला मिळणार तितकीच मंत्रीपद राष्ट्रवादीला मिळण्याची मागणी; अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण आलं समोर, वाचा एबीपी माझाचा रिपोर्ट