Yavatmal Crime News : लोहारा एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या बेपत्ता मजुराचा मृतदेह यवतमाळमधील (Yavatmal) हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मागे तलाव परिसरात आढळला होता. काही दिवसांपूर्वी मृतदेह सापडल्यानंतर पोलीसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. दरम्यान, प्रेयसीनेच त्यांच्या मुलाची हत्या केल्याची तक्रार हत्या झालेल्या तरुणाच्या वडिलांनी केली आहे. त्यानंतर लोहारा पोलिसांनी (Lohara Police) याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  निखील घरडे (रा. रेणुकानगर, लोहारा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणाचे वडिल राष्ट्रापाल पांडुरंग घरडे  यांनी लोहारा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.


लोहारा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार


अधिकची माहिती अशी की, मृत तरुण लोहारा एमआयडीसीतील प्रियदर्शनी सुतगिरणीमध्ये काम करायचा. निखील नेहमीप्रमाणे  13 मे रोजी सकाळी 6.30 वाजता सुतगिरणीत कामाला गेला. परंतु रात्री उशीरापर्यंतही तो घरी परतला नाही. त्यामुळे 14 मे रोजी सकाळी 10 वाजता मृतकाचे वडिल सुतगिरणीत गेले. त्या ठिकाणी चौकीदार व सुपरवायझर यांनी निखीलच्या प्रेमसंबंधाची माहिती दिली. 13 मे रोजी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास निखील सुतगिरणीच्या बाहेर गेला होता. फोन करून व शोध घेऊन सुद्घा थांगपत्ता न लागल्याने लोहारा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 


महिलेनेच मुलाचा घातपात केल्याचा संशय


दरम्यान बुधवारी मृतकाचे वडिल व मोठा भाऊ किर्तीकुमार हे निखीलच्या शोधात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मागच्या परिसरात पाहणी करीत होते. यावेळी तलावाच्या अंदाजे 30 फूट अलीकडे उंचावर एक मृतदेह दिसला. जवळ जावून बघितल्यानंतर मृतदेह हा निखीलचाच होता. मृतकाच्या शरीरावर शर्ट नव्हता तर नाकातून व कानातून रक्त येत असल्याचे दिसले. तसेच गळा आवळल्याच्या खुणाही आढळल्या. मृतकाचे त्या महिलेशी प्रेमसंबंध होते. दोघेही सुतगिरणीतून एकाचवेळी बाहेर पडले. त्यामुळे त्या महिलेनेच मुलाचा घातपात केल्याचा संशय आहे, अशी तक्रार लोहारा पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Nanded : नांदेडमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई! 8 किलो दागिने, 170 कोटींची बेहिशोभी संपत्ती; संजय भंडारी आहेत तरी कोण?