Crime News : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला पत्नीच्या अजब मागणीनंतर 15 दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे. हा कैदी सध्या अजमेर कारागृहात आहे. त्यांच्या पत्नीने अजमेरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज सादर केला आणि ‘आम्हाला मूल जन्माला घालायचं आहे, त्यासाठी पतीला 15 दिवसांचा पॅरोल मिळावा’, अशी विनंती केली आहे. या अर्जाला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप मेहता आणि फर्जंद अली, जोधपूर यांच्या खंडपीठाने ही याचिका स्वीकारली आणि याचिकाकर्तीच्या पतीला 15 दिवसांसाठी पॅरोल मंजूर केला.


भीलवाडा येथील 34 वर्षीय नंदलालला 6 फेब्रुवारी 2019 रोजी एडीजे कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, तेव्हापासून तो अजमेर तुरुंगात आहे. 18 मे 2021 रोजी त्याला 20 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. यानंतर ठरलेल्या तारखेला तो तुरुंगात परतला.


.. म्हणून रजा मंजूर करा!


या कैद्याच्या पत्नीने अजमेर जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला, जे पॅरोल समितीचे अध्यक्षही आहेत. या अर्जात तिने म्हटले की, ‘आमचं लग्न झालं, पण आम्हाला मुलबाळ नाही. त्यामुळे मुलाच्या जन्मासाठी माझ्या पतीला 15 दिवसांचा पॅरोल देण्यात यावा.’ अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जावर कोणतीही कारवाई न केल्याने नंदलालच्या पत्नीने थेट हायकोर्ट गाठून हीच विनंती केली.


दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, ‘कैद्याचे अर्जदाराशी लग्न झाले आहे, यात वाद नाही. वंश जपण्याच्या उद्देशाने मुले जन्माला घालणे, याला धार्मिक तत्वज्ञान, भारतीय संस्कृती आणि विविध न्यायिक निर्णयांद्वारे मान्यता दिली गेली आहे. न्यायालयाने म्हटले की, धार्मिक दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे पाहिले, तर हिंदू तत्त्वज्ञानानुसार मूल जन्माला घालण्याचा हक्क मिळणे हा 16 संस्कारांपैकी पहिला संस्कार आहे.’ आपला निर्णय सुनावताना न्यायालयाने या महिलेची मागणी करून, तिच्या पतीला 15 दिवसांची रजा मंजूर केली आहे.


हेही वाचा :