Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 'हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे', असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, 'मला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. पोलिसांना हे आधी कसं कळलं नाही. तिथे जाणारे आंदोलक मीडियाला घेऊन पोहचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. मग मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही.'


अजित पवार म्हणाले की, 'पोलीस विभाग या मागच्या सूत्रधाराचा शोध घेतील. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली. त्यामागे कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलीय. आम्ही आंदोलकांसोबत आणि संघटनांसोबत अनेकदा बैठकी घेतल्या आहे. पण नंतर एसटी कर्मचारी संघटनांचं देखील ऐकत नाही आहेत. त्यांनी तारतम्य सोडलं, जी भाषा वापरण्यात आली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही. पोलीस यंत्रणा याचा तपास करुन यामागे कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध घेतील.'


एसटी कर्मचाऱ्यांचा CSMT स्थानकात ठिय्या
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. 


अ‍ॅड.गुणरत्न सदावर्तेंना अटक, चार तास मेडिकल तपासणी
शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी अटक केली. त्यांना रात्री अकरा वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आधी नायर आणि मग जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे चार तास त्यांची मेडिकल जे.जे. मध्ये करण्यात आली. पोलिसांनी त्यांना रात्रभर माध्यमांसमोर येण्यापासूनचा रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. आज सदावर्ते यांना अकरा वाजताच्या दरम्यान न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha