Nanded Firing : नांदेड शहरातील नाईक नगर येथील रहिवाशी असणाऱ्या संजय बियाणी या व्यावसायिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केलाय. ज्यात बियाणी व त्यांचा वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात संजय बियाणी यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या गोळीबार गोळीबाराच्या घटनेनंतर नांदेड शहरात एकच खळबळ माजलीय.


मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकावर अंधाधुंद गोळीबार करून हत्या केल्याने शहरात खळबळ उडालीय. नांदेड शहरातील गीता नगर परिसरात बियाणी हे आपली गाडी घरासमोर लावत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी बियानी यांच्यावर तब्बल बारा गोळ्या झाडल्या व पसार झाले. या घटनेमुळे गीता नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या घटनेमुळे व्यासायिकामध्ये भीतीचे वातावरण आहे. 


खंडणीच्या वसुलीसाठी गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची चर्चा 


नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील मूळ रहिवाशी असणारे संजय बियाणी यांचे कुटुंब काही दशकापूर्वी नांदेड येथे राहण्यास आले व येथेच कायम स्थायिक झाले. संजय बियाणी हे नांदेडमधले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. नांदेड जिल्ह्यात राज मॉल, बियाणी अपार्टमेंट, राज हाईट्स, गोदावरी हाईट्स नावाने नांदेड शहरात व जिल्ह्यात हजारो अपार्टमेंट व मॉल्स नावाने त्यांचे उद्योग आहेत. तर बियाणी अपार्टमेंट ,राज अपार्टमेंट नावाने शहरातील अनेक भागात रहिवाशी वस्त्यांसाठी त्यांनी घरांची निर्मिती केलीय. तर आज काही दिवसांपूर्वीच माहेश्वरी समाजातील 76 गरजूंना त्यांनी घरे देऊन हक्काचा निवारा दिलाय. वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान गतवर्षी बियाणी यांना खंडणी साठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ज्यात त्यांच्या कार्यालयात घुसून एका कुप्रसिद्ध गुंडाच्या नावाने खंडणी मागण्यात आली होती. तेव्हा मोठ्या शिताफीने बियाणी यांनी मी तो नसल्याचे सांगून मोठ्या शिताफीने हल्ला परतवून लावला होता. दरम्यान आज सकाळी बियाणी यांच्या राहत्या घरासमोरच गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आलीय.


त्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून त्यांचा सुरक्षा रक्षक काढण्यात आलाय. त्यातच आज त्यांच्यावर घरासमोरच हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटने विषयी नांदेड पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यावर तूर्तास कोणतीही प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळलय. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केलाय.


नांदेडमध्ये गुंडाराज सुरु आहे: खासदार प्रताप पाटील


नांदेड जिल्ह्यात सध्या गुंडाराज चालू असून शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक व माझे जीवलग मित्र संजय बियाणी यांची त्यांच्या घरासमोर दिवसाढवळ्या गोळीबार करुन निघृणपणे हत्या झाल्याचे मला समजताच धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलीय. तर शहरातील कांही व्यापारी, डॉक्टर, राजकीय पुढाऱ्यांच्या जीवितास धोका असल्याची माहिती पोलिसांकडे असतानाही बियाणी यांची निघृण हत्या म्हणजे बिहारलाही लाजवेल असे हत्याकांड नांदेडला घडले असून सध्या नांदेडमध्ये पोलीस गुंडा राज सुरू असल्याची प्रचिती या घटनेवरुन दिसून येत असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. तर यापूर्वीही माझ्या मित्रमंडळातील कांही जणांवर प्राणघातक हल्ला झाला होता. ज्यात नांदेडमध्ये सुरू असलेल्या गुंडाराजमुळे मी माझ्या जीवलग मित्राला गमवलो असल्याची भावना नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केलीय. दरम्यान याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी चिखलीकर यांनी केली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha