पालघर: आपल्याच प्रेयसीची हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या पत्नीला वसई न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फिल्मलाईनमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करणाऱ्या 28 वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या करुन, तिचा मृतदेह गुजरात हद्दीत फेकून दिला होता.
या घटनेत सध्या एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून त्यात विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह सुटकेसमधून नेताना, बाईकवरुन 150 किमीचा प्रवास केला गेला होता. विशेष म्हणजे या बाईकवर त्या रात्री चौघेजण म्हणजे आरोपी, त्याची पत्नी आणि दोन मुले प्रवास करत होते. आरोपीच्या दोन मुलांना न्यायालयाची ऑर्डर घेवून शेल्टर होम मध्ये ठेवण्यात येणार आहे. सध्या ती दोन मुले नायगांव पोलीस ठाण्यातच आईबरोबर राहत आहेत.
नायगांव पोलीस ठाण्यात दिनांक 14 ऑगस्ट पासून बेपत्ता असलेल्या नयना महत हिची हत्या झाल्याचा उलगडा पोलिसांनी मंगळवारी केला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करणारी मयत नयना महत ही तरुणी आणि कलाकारांना ड्रेस घालणारा आरोपी मनोहर शुक्ला या दोघांचे प्रेमसंबध होते. मात्र मनोहरने नयनाला डावलून 2018 साली पौर्णिमेशी लग्न केलं. त्यानंतर पौर्णिमपासून मनोहरला दोन मुलं झाली. एक पाच वर्षाचा मुलगा तर दुसरी मुलगी दोन वर्षाची आहे.
नयना मनोहरला आपल्याशी लग्न करण्याचा तगादा लावत होती. त्यामुळे दोघांमध्ये भांडण होत होती. दिनांक 9 ऑगस्ट 2023 ला सोसायटीच्या आत लिफ्टने मनोहर आणि नयना दोघे रुममध्ये गेली होती. त्यानंतर तो एकटाच सोसायटीतून बाहेर पडला आणि रात्रीच्या सुमारास तो आपली पत्नी पौर्णिमा आणि दोन वर्षाची मुलगी हिला घेवून सोसायटीत आला. त्याने नयनाचा मृतदेह तिच्याच सुटकेसमध्ये भरुन आपल्या पत्नीच्या मांडीवर सुटकेस ठेवून, बाजूला मुलीला घेवून, गुजरात येथे सुमारे दीडशे किमी बाईकने प्रवास केला. वलसाड येथे एका ब्रिजच्या खाली तो मृतदेह फेकून दिला होता.
सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी सोसायटीमधून बाहेर पडून बाईकने आपल्या मुलगी आणि पत्नीसह बाईकवरुन जाताना दिसत आहे. मात्र बाईकवर तीन जण प्रवास करत असताना दिसत असले तरी त्या बाईकवर चार जण असल्याचा खुलासा झाला आहे. सुटकेस मध्ये नयनाचा मृतदेहही होता.
नयनाच्या मिसिंगची तक्रार दिनांक 14 ऑगस्टला झाली. तरी नयनाच्या हत्येचा उलगडा होण्यासाठी पोलिसांना एक महिन्याचा कालावधी लागला. सोसायटीचा सीसीटीव्ही आगोदरच बघितला असतं तर लवकर हत्येचा उलगडा झाला असता.
मंगळवारी वसई न्यायालयात आरोपी पती-पत्नीला हजर केलं असता त्यांना न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या दोघांनी केलेल्या कृत्याची शिक्षा त्या दोन निष्पाप मुलांना ही मिळत आहे. आईपासून वेगळं राहू शकत नसल्यानं दोन्ही मुले आज नायगाव पोलीस ठाण्यातच राहत आहेत. गुरुवारी नायगाव पोलीस न्यायालयाकडून दोघा मुलांना शेल्टर होममध्ये टाकण्यासाठीची परवानगी मागण्यात येणार आहे. त्यामुळे ही दोन निरागस मुले आता आई वडिलांच्या प्रेमाला मुकणार आहेत. वडिलांच्या चुकीचे फळ या दोघा निरागस मुलांना आणि त्याच्या पत्नीला भोगावी लागेल हे दुर्भाग्यपूर्ण आहे.
संबंधित बातमी :