वसई: फिल्मलाईनमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करणाऱ्या वसईच्या 28 वर्षीय तरुणीच्या हत्येचा उलगडा झाला असून तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर प्रियकराने मृतदेह गुजरातच्या हद्दीत वलसाड येथे खाडी किनारी फेकून दिला. लग्नाचा तगादा लावत असल्यामुळेच प्रेयसीची बादलीत तोंड बुडवून हत्या केल्याची कबुली प्रियकराने दिली आहे. मयताच्या बहिणीने मिसिंग तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि हा गुन्हा उघड झाला. पोलिसांनी आरोपीला तसेच तिला साथ देणाऱ्या त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
नयना महत ही मुलगी 14 ऑगस्ट पासून बेपत्ता असल्याची तक्रार नायगांव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता नयना महत हिची हत्या झाल्याचं उलगडा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर मनोहर शुक्ला याला अटक केली आहे.
नयना महत ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करत होती. तिचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकारांसाठी कॉस्ट्यूम विभागात काम करणारा मनोहर शुक्ला याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघेही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने त्या दोघांचे प्रेमसंबध निर्माण झाले होते.
नयना हिचा मोबाईल 9 ऑगस्टपासून बंद लागत होता. नयनाची बहीण जया हिने तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने अखेर जयाने नयनाच्या मिसिंगची तक्रार 14 ऑगस्टला नायगांव पोलीस ठाण्यात दिली. मयत नयनाने आरोपी मनोहर शुक्ला याच्यावर यापूर्वी वालीव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच विरार पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा ही दाखल केला होता. हे गुन्हे मागे घेण्यासाठी आरोपी हा नयनावर दबाव टाकत असल्याचा आरोप नयनाच्या बहिणीने केला आहे.
नायगांव पोलिसांनी नयना ज्या ठिकाणी राहत होती त्या नायगावच्या सनटेक सोसायटीतील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी दुपारी मनोहर शुक्ला आणि नयना लिफ्टमधून रुममध्ये जात असताना दिसले. मनोहर शुक्ला नंतर एकटा बाहेर पडला. त्यानंतर त्याने रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नीला आणि लहानग्या मुलाला सोबत घेवून येवून, एक ब्लू कलरची बॅग बाहेर घेवून जाताना दिसला. पोलिसांनी शुक्लाला ताब्यात घेवून त्याची चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली.
मनोहरने नयनाला डावलून 2018 साली दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं. त्याला दोन वर्षाचा मुलगाही आहे. मात्र नयना मनोहरजवळ लग्नाचा तगादा लावत होती. त्या दिवशीही याच मुद्द्यावरुन दोघांत भांडण झालं. नयनाने फिनाईल ॲसिड पिण्याचा प्रयत्न केला. मनोहरने ते रोखलं, मात्र अखेर मनोहरने बाथरुमच्या बादलीत तोंड बुडवून तिला ठार मारलं. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने बायकोला सोबत घेतलं. त्यानंतर एका बॅगमध्ये नयनाचा मृतदेह ठेवून तो मृतदेह गुजराच्या वलसाड खाडीत फेकून दिला.
नायगांव पोलिसांनी या प्रकरणी मनोहर आणि तिच्या पत्नीवर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली आहे.
ही बातमी वाचा: