नाशिक : नाशिक (Nashik) शहरासह परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन सुरूच असून सिन्नर तालुक्यात बिबट्याने (leopard Attack) हल्ल्याची मालिकाच सुरु ठेवली आहे. आशादायक बाब म्हणजे शहरात सात दिवसांत तीन बिबटे रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आले आहे. यातील दोन नर जातीचे बिबटे असून एकलहरे (Eklahare) परिसरातील गंगावाडी शिवारात आठवड्यात दोन बिबटे रेस्क्यू करण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नाशिकसह जिल्ह्यात विशेषतः सिन्नर (Sinner) तालुक्यात बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. येथील शेतकरी, नागरिकांना शेतात काम करणे कठीण झाले आहे. सायंकाळ होताच घर गाठावं लागत आहे. सततच्या बिबट्याच्या हल्ल्याने येथील भीतीच्या सावटाखाली आहेत. अशातच नाशिकच्या परिसरातून सात दिवसात तीन बिबट्याना रेस्क्यू करण्यात आले आहे. एकलहरे परिसरातील गंगावाडी शिवारातून एकाच मळ्यातून दोन बिबटे (leopard Resque) तर नाशिकरोड येथील जयभवानी रोड परिसरात एका बिबट्याला रेस्क्यु करण्यात यश आले आहे. बिबट्याने दर्शन, हल्ल्यामुळे नागरिकांची पाचावर धारण बसली आहे. वनविभागही सातत्याने येथील नागरिकांच्या संपर्कात असून बिबट जनजागृतीचे कामही सुरु असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
नाशिक शहरापासून जवळच असलेल्या एकलहरे भागातील गंगावाडी शिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याने येथील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने सदर परिसरातील अरुण विश्राम धनवटे यांच्या गट 409 या उसाच्या शेताच्या पिंजरा लावला होता. गुरुवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी पिंजऱ्यातून दिशेने डरकाळ्यांचा आवाज येऊ लागला. गावकऱ्यांनी पाहणी केली असता पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ वन विभागाला कळविल्यावर वन अधिकारी विजयसिंग पाटील, वनमजूर पांडू भीये आणि वाहनचालक अशोक खानझोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सात ते आठ वर्षांच्या नर जातीच्या बिबट्याला रेस्क्यू करून त्यांनी गंगापूर येथील रोपवाटिका या ठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले.
दरम्यान मागील आठवड्यात आठ सप्टेंबर रोजी नाशिकरोड (Nashikroad) परिसरात जयभवानी रोडवर तैनात करण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या रेस्क्यू झाला. तत्पूर्वी आर्टिलरी सेंटर परिसरात राहत असलेल्या शब्बीर सय्यद यांच्या कुटूंबातील दोन-तीन वर्षाच्या मुलाला घराबाहेर शौचास बसवले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्या हल्ल्याच्या तयारीत होता. त्यांनी तात्काळ घरात पळ काढला. लागलीच वनविभागाने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली, तसेच पिंजरा लावण्यात आला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे लक्षात आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा एकदा एकलहरे परिसरातच अरुण विश्राम धनवटे यांच्याच शेतात बिबट्या रेस्क्यू झाला. सात सप्टेंबर एक बिबट्या रेस्क्यू करण्यात आल्यानंतर पुन्हा नागरिकांना बिबट्याचा वावर आढळून आला होता. त्या अनुषंगाने वनविभागाने पाहणी करत याच ठिकाणी पिंजरा तैनात करण्यात आला होता. आज पहाटेच्या सुमारास सहा ते सात वर्ष वय असलेला नर जातीचा बिबट वन्यप्राणी रेस्क्यू करण्यात आले आहे. सदर बिबट वन्यप्राणी वनविभागाच्या ताब्यात सुरक्षितरित्या असल्याचे वनविभागाने सांगितले.
सिन्नर तालुक्यात सतत बिबट हल्ले
नाशिकच्या सिन्नर तालुक्यात सातत्याने बिबट हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. तालुक्यातील नायगाव, जोगलटेम्बी परिसरात मागील दोन चार दिवसात अनेक नागरिकांना बिबट्याने जखमी केल्याची माहिती आहे. शनिवारी जोंगल टेंभी यांच्यावर येथील हिरामण त्रंबक मोरे यांच्यावर सकाळी सहा वाजता बिबट्याने हल्ला चढविला. यात ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नायगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन नाशिकरोड बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. मात्र सततच्या घटनांमुळे येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली असल्याचे चित्र आहे.