नागपूर : नागपूरच्या पाचपावली परिसरात बागल आखाडाजवळ 21 जून ला घडलेल्या भयावह हत्याकांडाचा सर्व रहस्य एका 27 मिनिट 16 सेकंदांच्या ऑडिओ क्लिपमध्ये दडले असून ती ऑडिओ क्लिप पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांना त्या ऑडिओ क्लिपच्या आधारे त्यादिवशी आरोपी आलोक आणि त्याची मेहुणी आमिषा यांच्या दरम्यान नेमके काय घडले याची माहिती तर मिळालीच आहे. सोबतच ऑडिओ क्लिपमधील काही तपशिलांच्या आधारे मिळालेल्या संकेतानुसार पोलिसांनी आता मृतांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपुरात 20 आणि 21 जूनच्या दरम्यान पाचपावली परिसरातील पातुरकर आणि बोबडे कुटुंबीयांच्या घरात थरारक हत्याकांड घडलं. आलोक मातूरकर नावाच्या 40 वर्षीय टेलरने आपल्या सासू आणि मेहुणीची हत्या केल्यानंतर स्वतःच्या संपूर्ण कुटुंबालाही संपवले आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भात पोलिसांसमोर मोठा प्रश्न चिन्ह होता. मात्र, सुदैवाने पोलिसांना आरोपी आलोकची मेहुणी अमिषाच्या मोबाईल मध्ये 27 मिनिट 16 सेकंदांची एक ऑडिओ क्लिप सापडली. ती ऑडिओ क्लिप घटनेच्या दिवशीच रेकॉर्ड करण्यात आली होती. ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पोलिसांना या भयावह हत्याकांडाचा संदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहे.
दरम्यान, या हत्याकांडामागच्या खऱ्या कारणांची सुरुवात काही आठवड्यापूर्वी सुरू झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी आलोक आणि त्याची मेहुणी अमिषा या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होता. माझा जीजा आलोक मला मारहाण करतो आणि मानसिक व शारीरिक त्रास देतो अशा आशयाची एक तक्रार आमिषाने नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये 24 एप्रिल रोजी दिली होती.
दोघांमधले संबंध किती बिघडले होते याचा अंदाज घटनेच्या दिवशी आमिषाने तिच्या फोनमध्ये रेकॉर्ड केलेल्या 27 मिनिटांच्या ऑडिओ क्लिप आणि तिने तिच्या एका मित्राला पाठवलेल्या मेसेज वरुनही येत आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी रात्री जेव्हा आलोक अमिषाच्या त्याच्या घरी पोहोचला. तेव्हा अमिषा मोबाईलवर आपल्या मित्रासह चॅट करत होती. आलोकला पाहताच तिने मित्राला एक मेसेज पाठवले आणि त्यामध्ये तिने "तो टकल्या माझ्या घरी आला असून माझ्यासमोर बसला आहे" असं आलोकला उद्देशून लिहिले. त्यानंतर आमिषाने तिचा फोन बाजूला ठेवून ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केली आणि पुढील सत्तावीस मिनिटात अत्यंत भयावह गोष्टी त्या ऑडिओ क्लिप मध्ये रेकॉर्ड झाल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुरुवातीच्या दोन तीन मिनिटांमध्ये दोघांमध्ये औपचारिक बोलणं होते. दोघांच्या हसण्याचा आवाज येतो. मात्र त्यानंतर बराच वेळ ऑडिओ क्लिप मध्ये स्पष्ट आवाज येत नाही. त्यानंतर काही वेळाने आलोक संतापाच्या भरात शिव्या देऊ लागतो. त्यानंतर आलोकने चाकूने केलेल्या वारमुळे अमिषाचा किंचाळण्याचा आवाज येतो. आठव्या मिनिटांच्या जवळपास अमिषाचा तडफडणे आणि जखमी अवस्थेत जोरात जोरात श्वास घेण्याचा आवाज येतो. ऑडिओ क्लिपमध्ये याच ठिकाणी आलोक आमिषाला उद्देशून "ती मरत का नाही" असंही बोलताना ऐकू येतो. त्यानंतर पुन्हा काही वेळासाठी ऑडिओ क्लिपमध्ये शांतता पसरते. थोड्यावेळाने नळाच्या पाणी वाहण्याचा आवाज येतो ( कदाचित आलोक अमिषाला मारल्यानंतर चाकू पाण्याने धूत असावा ). सतराव्या मिनिटाच्या जवळच अचानकच आलोकच्या सासू लक्ष्मीबाई चा आवाज ऑडिओ क्लिप मध्ये येतो. कदाचित त्या वेळेपर्यंत त्या आलोकच्या घरातून आपल्या घरी परतलेल्या असाव्यात. घरात आलोकने आमिषाची हत्या केली आहे. हे पाहून ते जोरात ओरडतात, "जावई तुम्ही हे काय केलं" असा प्रश्न ते विचारतात. प्रत्युत्तरात आलोक "तुम्ही ओरडू नका, गप्प रहा, बाहेर आवाज जाईल" असं बोलून त्यांना शांत करतो. मात्र समोर रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पाहून लक्ष्मीबाई शांत राहत नाही आणि अचानकच आलोक त्यांच्यावरही चाकूने वार करत त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या करतो. ऑडिओ क्लिपमध्ये बराच वेळ लक्ष्मीबाई यांच्यातर्फे तडफडण्याचा आणि जोरजोरात श्वास घेण्याचा आवाजही रेकॉर्ड झाला आहे.
सत्तावीस मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये अमिषा आणि तिची आई लक्ष्मीबाई यांच्या हत्येचा घटनाक्रम रेकॉर्ड झाला असून पोलिसांसाठी तो मोठा पुरावा बनला आहे. सत्तावीस मिनिटानंतर कदाचित आलोकने अमिषाचा फोन स्वीच ऑफ करून त्यामधील सिम कार्ड काढून घेतल्यामुळे ती ऑडिओ क्लिप बंद पडते. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या सर्व घटना क्रमानंतर आलोक स्वतःच्या घरी पोहोचतो आणि त्या ठिकाणी सुरुवातीला स्वतःची पत्नी विजया तिची गळा चिरून हत्या करतो. वडील आपल्या आईला मारत आहे हे शेजारीच झोपलेल्या 14 वर्षीय मुलीच्या लक्षात आल्यामुळे ती वडिलांना विरोध करायला उभी रहाते. त्यामुळे संतापाच्या भरात आलोक तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर प्रहार करून तिची हत्या करतो. काही मिनिटांनंतर कुटुंबात एकटाच वाचलेल्या बारा वर्षीय साहिल या स्वतःच्या मुलाची ही तो झोपेत असताना उशीने तोंड दाबून हत्या करतो. संपूर्ण कुटुंबाला संपवल्यानंतर पहाटेच्या सुमारास आलोक त्याच खोलीमध्ये पंख्याला साडी बांधून स्वतः गळफास घेतो आणि आत्महत्या करतो.
संबंधित बातम्या :