आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
एक घर... एक कुटुंब... आणि एका क्षणात सगळं संपलं. ही घटना घडली आणि काही तासांत सोशल मीडियावर एक कारणही ठरलं.

छ. संभाजीनगर : जिल्ह्यातील (Sambhajinagar) एका तरुणाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पालक आणि मुलांमधील संवादाचा पुल घट्ट बांधण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त होत आहे. आयफोन हवा होता म्हणून त्याने आयुष्य संपवलं... पण तपास पुढे सरकला... आणि या चर्चेलाच आता पोलिसांनी (Police) ब्रेक लावलाय... आयफोन (Iphone) हे आत्महत्येचं कारण असल्याचं प्राथमिक तपासात दिसत नाही, असं डीसीपी रत्नाकर नवले यांनी स्पष्ट केलंय. व्हायरल व्हिडिओतील प्रत्यक्षदर्शी संजय जाधव यांनीही तेच सांगितलं. मुलाला आयफोन हवा होता, अशी चर्चाच झाली नव्हती. याउलट त्याच्याकडे आधीपासून आयफोन होता...मग एका कुटुंबावर ही वेळ का आली? नेमकं त्या घरात काय घडलं होतं? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.
एक घर... एक कुटुंब... आणि एका क्षणात सगळं संपलं. ही घटना घडली आणि काही तासांत सोशल मीडियावर एक कारणही ठरलं. “आयफोन हवा होता... म्हणून तरुणाने आत्महत्या केली. ”पण एका आयफोनला या दुःखद घटनेचं कारण ठरवणं... कदाचित सत्यापासून दूर जाणारं ठरू शकतं. कारण पोलिसांच्या प्राथमिक तपासात आयफोन हे कारण असल्याचं दिसत नाही. तरुण तणावात होता... त्याला समजावण्याचा प्रयत्न केला जात होता... कुणीतरी “आयफोन 15 देतो” असंही म्हटलं होतं. पण त्या एका वाक्याभोवती फिरणारी चर्चा... एका कुटुंबाच्या दुःखापेक्षा मोठी ठरू लागली आहे.
या घटनेनंतर एक व्हायरल व्हिडिओ समोर आला, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तरुणाशी आयफोनबाबत बोलताना दिसते. एबीपी माझाने त्या आवाजाचा शोध घेतला आणि माजी सरपंच संजय जाधव यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यांनी सांगितलं की, “मुलाला आयफोन हवा होता, अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. ”कारण... त्या मुलाकडे आधीपासूनच आयफोन होता. जाधव त्याला समजावत होते की “तुझ्याकडे आयफोन आहे... आई-वडील तुझे किती लाड करतात...”कदाचित त्या क्षणी कुणालाच कल्पना नव्हती... की काही वेळातच हे घर कायमचं उद्ध्वस्त होणार आहे, असे प्रत्यक्षदर्शी संजय जाधव यांनी सांगितले.
मग प्रश्न उरतो...आत्महत्येचं खरं कारण काय?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात वडिलांसोबत झालेला वाद समोर येतोय. पण तो वाद नेमका कशावरून झाला? काय बोललं गेलं.? कुणाच्या मनात काय होतं?
या प्रश्नांची उत्तरं आता कदाचित कधीच मिळणार नाहीत. कारण त्या घराची कहाणी सांगणारे... वडील नाहीत... आई नाही... आणि मुलगाही नाही. तीन माणसं...
तीन आयुष्यं... आणि मागे उरलेलं एक घर... शांत... सुन्न... आणि असंख्य प्रश्नांनी भरलेलं आहे.
आयफोनच्या पलिकडे एक कुटुंब
कधी कधी एका क्षणाचा राग आयुष्यभराची शिक्षा देऊन जातो. एका वादाने सुरुवात झाली आणि शेवट झाला तो संपूर्ण कुटुंबाच्या अंताने. आज आयफोनची चर्चा होतेय...पण त्या आयफोनच्या पलीकडे एक कुटुंब होतं...आईची माया होती...वडिलांची स्वप्नं होती... आणि मुलाचं एक आयुष्य होतं. पण, आज नाही ते घर...नाही ते आई-वडील...नाही तो मुलगा उरलाय. फक्त एक प्रश्न जिवंत आहेत. नेमकं त्या शेवटच्या क्षणी काय घडलं होतं? आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तरही त्या कुटुंबासोबतच कायमचं काळाच्या पडद्याआड गेलंय.
हेही वाचा
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?






















