मुंबई : मुलांचे भविष्य उजवल व्हावं म्हणून पालक त्यांना चांगलं शिक्षण देण्याच्या प्रयत्नात असतात. रक्ताचं पाणी करून त्यांना चांगले शिक्षणही देतात. पण, आजकालचे काही उच्चशिक्षित तरुण गुन्हेगारीच्या वळणावर चालत असल्याचं दिसून येत आहे. मग, ते ‘बुली बाई’, ‘क्लब हाऊस’ अॅपमधील आरोपी असतील किंवा सायबर गुन्हेगार (Cyber Fraud). आता साकीनाका पोलिसांनी देखील अशाच एका केमिकल इंजिनियरला कोलकत्तामधून अटक केली आहे. सदर इसम लोकांना ऑनलाईन गिफ्टच आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होता.


समरजोती दास, वय 26, शिक्षण केमिकल इंजिनिअर, पण काम लोकांना ऑनलाईन लॉटरीमध्ये गिफ्टच आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणे. समरजोती दासच्या घरी त्याची वयोवृद्ध आई आहे. तर, वडील समरजोती लहान असतानाच वारले. आईने पडतील ते कष्ट करून समरजोती दासला शिकवलं आणि त्याला केमिकल इंजिनिअर बनवलं. पण, समरजोतीचे पाय गुन्हेगारी विश्वाकडे वळले आणि त्याने सायबर गुन्हेगारी सुरू केली.


कशी करायचा लोकांची फसवणूक?


समरजोती दासने सर्वात आधी फिर्यादीला फोन केला. त्यांना एक ॲपलचा कॉम्प्युटर, ॲपल आयफोन आणि इतर काही बक्षीस लॉटरीमध्ये लागल्याच सांगितलं. यानंतर फिर्यादीला त्याने एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. त्या व्यक्तीचा मोबाईल एक्सेस समोरजोतीकडे जावा, यसाठीचे ते ॲप्लिकेशन होते. ज्यानंतर मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे त्याने इतर सर्व माहिती चोरली.


फिर्यादीकडून उकळलेले पैसे समरजोती दासने कोलकाताच्या एटीएममधून काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्यानंतर साकीनाका पोलिसांचे पथक कोलकात्याला पोहोचले आणि 7 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर समोरजोती दासला बेड्या ठोकल्या. मात्र, तो एकटा नसून त्याचा अजून एक मित्र देखील यात सामील आहे, ज्याचा शोध पोलिस घेत आहेत.  तसेच यामागे एक मोठा रॅकेट असण्याची शक्यता सुद्धा पोलिसांनी वर्तवली आहे.


पोलिसांनी लोकांना अशा सायबर गुन्हेगारांन पासून सावध राहण्याचा इशारा दिला असून, जर असा प्रकार कोणासोबत घडला असेल, तर त्यांना तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याससुद्धा सांगितले आहे. पोलिस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत देशमुख यांच्या निदर्शनास पोलीस सहाय्यक निरीक्षक धीरज गवारे, पोलीस नाईक गणेश गायकर, पोलीस शिपाई धनाजी पांढरे या पथकाद्वारे ही कामगिरी बजावण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha