Oscar 2022 : साऊथचा सुपरस्टार आणि ‘सिंघम’ फेम अभिनेता सुर्याचा (Suriya) 2021चा सर्वात लोकप्रिय चित्रपट 'जय भीम' (Jai Bhim) ऑस्करच्या (Oscar 2022) शर्यतीत सामील झाला आहे. ऑस्करच्या शर्यतीत उतरलेल्या 276 चित्रपटांची यादी जाहीर झाली असून, त्यात ‘जय भीम’च्या नावाचाही समावेश आहे.


केवळ ‘जय भीम’च नाही, तर मल्याळम चित्रपट अभिनेता मोहन लाल (Mohanlal) यांचा 'मरक्कर' (Marakkar: Arabikadalinte Simham) हा चित्रपट देखील ऑस्करच्या शर्यतीत उतरलेल्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. अनेक विक्रम आपल्या नावे केलेल्या सुर्याच्या या अत्यंत लोकप्रिय चित्रपटाने आणखी एक यशाचे उदाहरण समोर ठेवले आहे.


सुर्याच्या प्रोडक्शन हाऊस 2D ने देखील आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून, ‘जय भीम’च्या ऑस्कर शर्यतीत सामील झाल्याची घोषणा केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'ऑस्करच्या शर्यतीत! अकादमी पुरस्कारांसाठी निवडलेल्या 276 चित्रपटांच्या यादीत जय भीमचाही समावेश झाला आहे. 94व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन.'



‘जय भीम’ चित्रपटामध्ये सुर्या वकील चंद्रूची भूमिका साकारत आहे, तर त्याच्यासोबत प्रकाश राज, राव रमेश, राजिशा विजयन आणि लिजो मोल जोस देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल यांनी केले असून, त्याची कथाही त्यांनीच लिहिली आहे. ‘जय भीम’ची निर्मिती सुर्याची प्रोडक्शन कंपनी 2D एंटरटेनमेंटने केली आहे.


प्रियदर्शन दिग्दर्शित ‘मरक्कर’ हा मल्याळम चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट आहे. यात मलबार सागरी अधिपती कुंजली मरक्कर IV आणि पोर्तुगीजांविरुद्धच्या लढ्याची कथा सांगितली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स आणि सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन, असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


94व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी 27 जानेवारीपासून मतदान सुरू होणार असून, 1 फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 8 फेब्रुवारी 2022 रोजी ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha