Kokan Nagar Panchayat Election: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार नगरपंचायतीच्या निवडणूका झाल्या. या चार पैकी दोन नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. तर दोन नगरपंचायती भाजपच्या ताब्यातून गेल्या आहेत. कुडाळ नगरपंचायतीवर राणेंची एकहाती सत्ता होती. मात्र आता राणेंना याठिकाणी सत्तेसाठी काँगेसची मदत मिळाल्यास सत्ता येऊ शकते. त्यामुळे कुडाळ मध्ये काँगेस किंगमेकरच्या भूमिकेत आहे. कुडाळ नगरपंचायत मध्ये भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी दोघांनाही सत्तेसाठी काँगेसच्या मदतीची आवश्यकता आहे. तर देवगड-जामसंडे नगरपंचायत राणेंच्या ताब्यातून गेली आहे. त्यामुळे राणेंना हा धक्का मानला जात आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कसई-दोडामार्ग, देवगड-जामसंडे आणि वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, निकालही हाती आले. आता मात्र नगराध्यक्ष कोण आणि कोणत्या पक्षाचे याची चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यक्ष कोण या प्रश्नाचे उत्तर अस्पष्ट आहे. कारण अद्याप शासनाने या पदासाठी आरक्षण जाहीर केलेले नाही. यासाठी आणखी किमान वीस दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच होऊ शकतात. तोपर्यंत नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा याची चर्चा आणि घडामोडी सुरू झाल्या आहेत.


नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदावरचे चेहरे सध्या चाचपले जात आहेत. वाभवे-वैभववाडी आणि कसई-दोडामार्ग नगरपंचायतीवर भाजपला निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीवर शिवसेना- राष्ट्रवादी आघाडीचे बहुमत आहे. तर कुडाळ मध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. त्यामुळे या नगरपंचायतीत कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष बसेल याची चर्चा सुरू आहे.


वाभवे-वैभववाडी भाजपचे 17 पैकी 10 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे 5 आणि अपक्ष 2 नगरसेवक आहेत. त्यामुळे तिथे भाजपचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कसई-दोडामार्ग मध्येही भाजपची त्यापेक्षा अधिक मजबूत स्थिती आहे. तिथे तर भाजपचे 13 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे केवळ 2 नगरसेवक, राष्ट्रवादीचा एक आणि अपक्ष एक असे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे तिथेही भाजपचाच नगराध्यक्ष बसेल. मात्र देवगड-जामसंडे आणि कुडाळ नगरपंचायत मध्ये काठावर बहुमत आहे. देवगडात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करून निवडणूक लढविली. शिवसेनेचे 8 नगरसेवक आणि राष्ट्रवादीचा 1 असे मिळून 9 नगरसेवक या आघाडीकडे आहेत. भाजपचे 8 नगरसेवक असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे पुरेसे बहुमत आहे. त्यामुळे तिथे शिवसेनेला नगराध्यक्ष बसण्याची शक्यता आहे. मात्र कुडाळ नगरपंचायत मध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. कुडाळ मध्ये शिवसेनेचे 7 नगरसेवक निवडून आले आहेत आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचे 8 नगरसेवक आहेत. मात्र स्पष्ट बहुमत कुणालाही नाही. परंतु काँग्रेसचे जे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. त्या 2 नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. हे काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेला साथ देतात की भाजपला यावर कुडाळ नगरपंचायतीची सत्ता समीकरणे अवलंबून आहेत. काँग्रेस पक्ष जिल्ह्यात स्वतंत्रपणे लढला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. स्वाभाविकच काँग्रेसच्या राज्यस्तरावरील नेत्यांकडून आपल्या नगरसेवकांना काय आदेश देतात ते पाहणं महत्वाचे आहे.


कुडाळसारख्या महत्वाच्या नगरपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होणार हे निश्चित आहे. भाजपचे स्थानिक नेते रणजीत देसाई यांनीही कुडाळ नगरपंचायतीवर भाजप सत्ता स्थापन करेल असे म्हटले आहे. देशात आणि महाराष्ट्रात भाजप विरोधात काँग्रेस असे चित्र आहे. स्थानिक पातळीवर भाजपला काँग्रेस साथ देईल का? हा खरा प्रश्न आहे. तसे काही घडलेच तर मात्र भाजप सत्तेवर येऊ शकते. त्याशिवाय रणजीत देसाई यांनी भाजपची सत्ता स्थापन होईल असा जो दावा केला आहे. त्यानुसार काँग्रेस किंवा शिवसेनेतील कोणी नगरसेवक त्यांच्या गळाला लागतील का? असा एक प्रश्न उभा राहिला आहे. अर्थात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीपर्यंत तरी कुडाळ मध्ये काही नाट्यमय राजकीय घडामोडी घडतील का? याची उत्सुकता आहे. या निवडणूक झालेल्या चारही नगरपंचायतींवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी केव्हा होणार? हा प्रश्न निवडून आलेल्या नगरसेवकांना आहेच. खरेतर या पदांची आरक्षणेच अद्याप निश्चित झालेली नाहीत. ही आरक्षणे राज्य सरकारचे नगरविकास खाते निश्चित करणार आहे. त्याची सोडत निघणार आहे. ही आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर त्यासंबंधीचे गॅझेट प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर राज्य सरकार त्या-त्या जिल्ह्यांच्या नगरविकास विभागाकडे आरक्षणाची यादी पाठवणार आहे. त्यानुसार पुढे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. ही सगळी प्रक्रिया पार पडेपर्यंत फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्यता आहे.


देवगड-जामसंडे नगरपंचायत मध्ये ज्यादिवशी मतमोजणी संपली त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन तेथील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा गट स्थापन करून त्याची नोंदणी करण्यात आली. कुडाळ मध्येही शिवसेनेच्या नगरसेवकांचा गट तयार करण्यात आला आहे. तर वैभववाडी आणि दोडामार्ग मध्ये निर्विवाद बहुमत असलेल्या भाजपकडून आपले नगरसेवक फुटून जाऊ नयेत याची खबरदारी घेतली आहे. आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष बसावा असं सर्वच पक्षांना वाटत आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha