पुणे :  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ( Maharashtra State Commission for Women) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याविषयी समाजमाध्यमात (Social Media) अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर होत असलेल्या टीका-टिप्पणीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर राजकीय नेत्यांवर टीका करताना खासगी, वैयक्तिक, चारित्र्यावर शंका उपस्थित करणारे मजकूर प्रसारीत केले जातात. 


राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या बाबतीत एक अश्लील पोस्ट विकास सावंत,  जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे, अमोल के. पाटील  यांनी फेसबुकवर शेअर केली होती. या चौघांवर पुणे सायबर पोलीस ठाण्यात आयपीसी 354 (अ) आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे  यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यातील संशयित असलेल्या  जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे आणि अमोल पाटील यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांचे मोबाईल क्रमांक सायबर पोलिसांनी मिळवले. त्याआधारे पोलीस पोलिसांनी जयंत रामचंद्र पाटील या सांगली जिल्ह्यातील  धनगरवाडीत राहणाऱ्या आरोपीपर्यंत पोहचले . त्याला ताब्यात घेतले असता तपसादरम्यान तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले.  त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस देऊन त्याचा जबाब नोंदवून मोबाईल जप्त केला.


तसेच सोशल मीडिया पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट केलेल्या फेसबुक युजर  नावाचे अकाऊंट असलेल्या संशयित व्यक्तीची फेसबुक कंपनीकडून तांत्रिक माहिती घेण्यात आली. पोलिसांनी वसंत रमेशराव खुळे (वय-34 रा. रहाटी, ता.जि. परभणी) याचा शोध घेतला असता आरोप रहाटी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने रहाटी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला सायबर पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवून घेत फोन जप्त केला. त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.


याशिवाय फेसबुक युजर प्रदीप कणसे नावाने पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट करण्यात आली होती. पोलिसांनी हे फेसबुक अकाउंट वापरणाऱ्या संशयिताचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याला देखील सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस दिली आहे. सायबर पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर अश्लील पोस्ट करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्यांचा माग काढून गुन्हा उघडकीस आणला आहे.


राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी  अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता.