छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar) वाळूज भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीचे अनैतिक संबंध असल्याचे कळल्यावर त्याला समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला पतीने केलेल्या मारहाणीत तीचा जीव गेला आहे. बाहेरच्या महिलेचा नाद सोडून देण्यास सांगीतल्याचा राग मनात धरून 30 वर्षीय पतीने स्टिलच्या झाऱ्याने व लाथाबुक्याने 28 वर्षीय पत्नीला बेदम मारहाण केली होती. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे ही घटना उघडकीस आली असून, प्रियंका संदिप राऊत (वय 28) असे मयत महिलेचे नाव आहे. तर, संदीप राऊत (वय 30) असे आरोपी पतीचे नाव आहे.
प्रियंका हिचा विवाह 2019 मध्ये संदिप राऊत याच्यासोबत झाला होता. काही वर्षांपूर्वी संदीप आणि प्रियंका हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगांव येथील सावता माळी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गजानन ढेरे यांच्या घरात भाडे करारावर राहत होते. या काळात संदिप राऊत याचे रांजणगांव (शे.पु.) परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. विशेष म्हणजे याबाबत खुद्द संदीप यानेच आपल्या पत्नीला याची माहिती दिली. तसेच मी त्या महिलेसोबतच राहणार आणि तुला सोडून देणार म्हणून गेल्या काही दिवसापासून प्रियंकाशी वाद घालून नेहमी मारहाण करत होता. तसेच, तिला जीवे मारण्याची धमक्या देत होता.
स्टीलच्या झाऱ्याने केली मारहाण...
दरम्यान, शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संदिप राऊत याने सासू विमलबाई डेरे यांना फोन करुन सांगितले की, माझे आणि प्रियंका हिचे भांडण झाले आहे. प्रियंकाला तुमच्या घरी घेवून जा, मला तिच्या सोबत राहायचे नाही. त्यानंतर विमलबाई यांना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास प्रियंकाचा फोन आला तेव्हा ती मध्यवर्ती बसस्थानकावर होती. तिचा भाऊ तिला घेण्यासाठी गेला असता तिने सांगितले की, मला नवऱ्याने लाथा भुक्क्याने व स्टीलच्या झाऱ्याने खूप मारले. तिला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी प्रियंकाचा भाऊ आनंद गणेश डेरे यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी संदिप रामदास राऊत विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाहेरच्या बाईचा नाद सोडून दे...
मी एकदा तुला सोडेल पण त्याबाईला सोडणार नाही असे म्हणून संदीप हा प्रियंकाला रोज शिवीगाळ करून मारहाण करत होता. ही बाब प्रियंकाने भाऊ आनंद व आई विमलबाई डेरे, वडील गणेश डेरे यांना दिवाळीत घरी आली तेव्हा सांगीतली. त्यावर प्रियांकाला मारहाण करु नको, तुझे बाहेरचे धंदे बंद कर, बाहेरच्या बाईचा नाद सोडून दे अशी समज सासरच्या लोकांनी संदीपला दिली होती. याचाच त्याला राग होला होता आणि त्यावरून तो प्रियंका सोबत वाद घालून मारहाण करत होता. याच मारहाणीत अखेर प्रियंकाचा जीव गेला.