कल्याण :  राज्यात आगामी लोकसभा निवडणूक महायुती एकदिलाने निवडणूक लढवणार असल्याचे सत्ताधारी सांगत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याच कल्याण (Kalyan) मतदारसंघात भाजपकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. ज्यांनी गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेत बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्वजण विदूषक आहेत .असा भास होतो, अशी टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नाव न घेता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ( Ganpat Gaikwad) यांच्यावर केले आहे.  या टीकेनंतर आता कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट भाजपमध्ये सुरू असलेला वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


चार राज्यांच्या निकालानंतर कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालया बाहेर जल्लोष साजरा केला. यादरम्यान भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि भिवंडी या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येणार असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा केला होता. यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांना पाहणी दौरा दरम्यान याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी खासदार शिंदे यांनी गणपत गायकवाड यांचे विधान मनोरंजनापुरते, प्रसिद्धीसाठी आहे. त्यामुळे मी टीकेला उत्तर देत नाही काम करतो काही लोकांना आपले व्यक्तव्य मागे घ्यावे लागले होते, याची आठवणही खासदार शिंदे यांनी करून दिली. 


गणपत गायकवाड यांची बोचरी टीका


खासदार श्रीकांत शिंदेच्या या प्रत्युत्तरानंतर परत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी एक ट्वीट केले. ज्यामध्ये त्यांनी नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली. कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून हा वाद सुरू आहे. डोंबिवलीत मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये भाजपा पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला. हा वाद आता मिटल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले गेले होते. परंतु भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि या भेटीदरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली होती. कशा प्रकारे त्यांना प्रशासन आणि पोलिसांकडून दुजाभाव दिला जात आहे आणि याच्या मागे शिवसेना आहे असे सांगितले होते. हा वाद सुरू असताना आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ट्विट करीत श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केल्याने आता हा वाद अजून पेटणार आहे अशी याची शक्यता वर्तवली जात आहे







गायकवाड यांच्या ट्विट नंतर शिंदे गट आक्रमक 


भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या टीकेनंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे.  खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामामुळे पोटदुखी आहे, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशी विधाने करत  जनतेसमोर विदूषकाची भूमिका करत स्वतःचे हसू करून घेत असल्याची टीका शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली.