Nashik Malegaon News नाशिक : मालेगाव, सटाणा, चांदवड, येवला, जळगाव व नाशिक शहरातून दुचाकींची चोरी करत विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस यंत्रणेस यश आले आहे. एका चोरट्यास पोलिसांनी (Police) सापळा रचून अटक करत त्याच्याकडून 6 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 13 दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच या चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या सहा जणांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


मालेगाव (Malegaon) शहरासह इतर तालुक्यांमध्ये दुचाकी चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, उपअधीक्षक सूरज गुंजाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह संबंधित पोलीस ठाण्यांच्याअधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. 


गुप्त माहितीच्या आधारे संशयित जेरबंद


स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.राजू सुर्वे यांचे पथक स्थानिक पोलीस यंत्रणेबरोबर तपास करत असताना शहरातील अय्युबी चौक परिसरात काही संशयित चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पथकास मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अय्युबी चौक परिसरात सापळा रचून संशयित इकलाख अहमद इम्तियाज अहमद (23, रा. इस्लामाबाद) यास हिरो स्प्लेंडर दुचाकीसह ताब्यात घेतले. 


पोलिसी खाक्या दाखवताच दिली चोरीची कबुली


पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच इकलाख अहमदने साथीदार जहीर अहमद अब्दुल (रा. संगमेश्वर) याच्यासह दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सखोल चौकशीत इकलाखने साथीदार अब्दुल याच्यासह मालेगाव सटाणा, चांदवड, येवला, जळगाव, नाशिक शहर अशा ठिकाणांवरून एकूण १३ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. 


13 दुचाकी जप्त, सहा गुन्हे उघडकीस


पोलिसांनी त्याच्याकडून हिरो स्प्लेंडर, होंडा , ड्रीम युगा, हिरो एच.एफ. डिलक्स, यामाहा एस. एस., हिरो अशा 13 दुचाकी जप्त केल्या. इकलाखने दिलेल्या कबुलीवरून मालेगाव तालुका, सटाणा, चांदवड, येवला तालुका, मालेगाव छावणी, जळगाव जिल्हा, पेठ, भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले दुचाकी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.


आणखी सहा जणांना अटक


चोरी केलेल्या दुचाकी विकत घेणारे निसार अहमद अक्सर हुसेन (रा. देवीचा मळा), मुजिब अहमद जमील अहमद (रा. संगमेश्वर), फरान अहमद इमान अहमद (रा. मरीमाता मंदिरासमोर), शोएब मोहमद अजहर (रा. टेंशन चौक), मोहमद शोएब मोहमद इद्रिस (रा. नयापुरा), भिक्न दादामिया पिंजारी (रा. देवीचा मळा) या सहा जणांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 


यांनी बजावली कामगिरी


इकलाखचा साथीदार जहीर अब्दुल हा फरार असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे. इकलाखकडून दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पो.नि. राजू सुर्वे, स.पो.नि. हेमंत पाटील, हवा. वेतन संवस्तरकर, संतोष हजारे, सुनील पाडवी, देवा गोविंद, गिरीश बागुल, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी बजावली आहे.


आणखी वाचा 


Mahesh Gaikwad : महेश गायकवाड यांचा डिस्चार्ज रद्द, डॉक्टरांनी कारण सांगितलं!