पिंपरी-चिंचवड, पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव होते. काळेवाडीत राहणारा सार्थक हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता.


साधारण दहाच्या सुमारास सार्थक तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. पण रेलिंगवर घसरगुंडी खेळणं धोकादायक होतं. याची कल्पना असल्यानं एका मित्राने तू इथं खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेल, असं म्हणत रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने तो ऐकला नाही, तो त्याच्याच धुंदीत होता. मात्र अचानकपणे त्याचा तोल गेला आणि तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला, अशी माहिती सार्थकच्या मित्रांनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या अपघातात सार्थकला जोराचा मार लागला, तातडीनं त्याला रुग्णालयात हलविण्यात आलं. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत. 


घटनेची पालिका चौकशी करणार


शाळेवर कठोर कारवाई करा आणि माझा मुलगा मला परत द्या. अशी मागणी सार्थकच्या वडिलांनी केलीये. तर घडलेल्या घटनेची पालिकेकडून चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आल्याची माहिती, पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.


माझा मुलगा पर द्या; वडिलांचा आक्रोश


सार्थकला याच वर्षी पिंपरीतील शाळेत शिक्षणासाठी घातलं होतं. यापूर्वी तो काळेवाडीतील शाळेत शिकायचा. माझा मुलगा मला आहे तसा परत ज्या, असा आक्रोश सार्थकच्या वडिलांनी केला आहे. ते म्हणाले की, माझा मुलगा सकाळी मला सांगून शाळेत आला. शाळेत येताना काळजी घ्या आणि नीट कामावर जा, असं म्हणाला. मात्र काही वेळातच मला फोन आला आणि दवाखान्यात यायला सांगितलं. सार्थकला दुखापत झाल्याचं सांगितलं. मात्र सार्थकचा मृत्यू झाला होता. शाळेवर कठोर कारवाई करा आणि माझा मुलगा जसा सकाळी शाळेत आला होता तसाच परत करा, अशी मागणी वडिलांनी केली आहे. 


हसत्या खेळत्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू


सार्थकचा अपघाती मृत्यू झाला. सकाळी घरी आई-वडिलांशी झालेला संवाद शेवटचा ठरला. त्याच्या अचानक जाण्याने कांबळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातलं हसतं-खेळतं मुल गेल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 


शिक्षकांनो, पालकांने मुलांकडे लक्ष द्या!


सध्या मुलं सोशल मीडियावर जे स्टंट पाहतात ते स्टंट करत असतात. सोशल मीडियापाहून करामती केल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यामुळे आता या मुलांकडे पालकांनी आणि शाळेतील शिक्षकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे. 


इतर महत्वाची बातमी-