Pandharpur Crime News : गेल्या काही महिन्यांपासून एक दहावी पास महाराज रुग्णांवर मधुमेह आणि हाडांच्या त्रासाबाबत उपचार करत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला मिळाल्या होत्या. यानंतर बोगस डॉक्टरवर (Bogus Doctor) कारवाई करण्यात आली आहे. केवळ दहावी पास असलेल्या आणि चार दिवसाचे ट्रेनिंग घेतलेल्या या बोगस महाराजाने थेट जालना (Jalna) येथून येऊन पंढरपुरात (Pandharpur Crime News) दवाखाना थाटला होता. याबाबत माहिती मिळताच आरोग्य विभागाकडून पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाची मदत घेऊन या दवाखान्यावर धाड टाकली. यावेळी या बोगस डॉक्टरकडून रुग्णांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने पंचनामा केल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सुडके यांनी दिली आहे.
शहरातील जुना अकलूज रस्ता येथील चंद्रभागा बस स्थानकामागे नारायण देव बाबा भक्तनिवास येथे पोलीस व आरोग्य विभागाने धाड टाकली. त्यावेळी दत्तात्रय सदाशिव पवार (रा. जालना) हे शुगर व हाडासंदर्भात त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी एका व्यक्तीला 500 रुपये फी आकरल्याची माहिती उपस्थित रुग्णांकडून मिळाली. एका दिवसात अंदाजे 75 ते 80 रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे पवार यांनी सांगितले.
दहावी पास बोगस डॉक्टरवर कारवाई
अधिकाऱ्यांनी पवारांना विचारल्यानंतर त्यांनी शेगाव दुमाला व पंढरपुरात तीन वर्षापासून उपचार करत आहे. रुग्णांवर उपचार करण्याबाबत कोणते ही अधिकृत शिक्षण घेतले नाही. इंडीयन मेडिकल कॉन्सील ॲक्ट 1956 महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1961 चे सर्टीफिकेट नाही. तसेच सातारा येथील एका संस्थेत चार दिवस उपचार करण्याबाबत प्रशिक्षण घेतले, असे सांगितले. यामुळे बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली असून दवाखाना आता बंद करण्यात आला आहे.
राज्यभर बोगस डॉक्टर पकडण्याची मोहीम
ही कारवाई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सुडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, आरोग्य विस्तार अधिकारी पी. आर. जावळे, नगरपरिषद आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ, पोलीस कर्मचारी धनंजय जाधव, प्रवीणकुमार सोनवले, राहुल कांबळे या पथकाने केली. नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी सध्या राज्यभर बोगस डॉक्टर पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही कारवाई केल्याचे डॉ. महेश सुडके यांनी सांगितले.
आणखी वाचा